Saturday, November 2, 2024
Homeब्लॉगदेह जावो अथवा राहो...

देह जावो अथवा राहो…

आषाढी एकादशीचं दैवत आहे पंढरपूरचा विठुराया. त्याचं रूपही आषाढातल्या सावळ्या मेघासारखं सावळं; परंतु अत्यंत देखणं आहे. भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी गेलेला विठुराया, आई-वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने त्याच्याकडे न पाहता उभं राहण्यासाठी दिलेल्या विटेवर तो विठुराया त्याची वाट बघत उभा राहिला, तो आजही तिथेच म्हणजे पंढरपुरात उभा आहे. त्याच्या भेटीला दरवर्षी जातो तो वारकरी. त्याच्या भेटीला जाण्यासाठी आणि समाजाची एकता, त्याचं सामर्थ्य दाखवणारी दिंडी संतांनी विठ्ठलाच्या चरणी समर्पित केली. देह जावो अथवा राहो! पांडुरंगी दृढ भावो!!असा भाव निर्माण केला. आज दशकं, शतकं उलटली तरी हा सोहळा तितक्याच उत्साहानं सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्ष देहरुपानं जाऊन विठुरायाचं दर्शन घेता येत नसलं तरी अंतरीत तो सदैव विसावलेला आहे.

आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवशीपासून चार्तुमास सुरू होतो. सणवारांची रेलचेल असते. या दिवशी भगवान विष्णु निद्राधीन होतात. चार महिन्याचं नियमबद्ध जीवन सुरू होते. वातावरणाची आणि संस्कृतीची सांगड घालून आयुर्वेदाचा आधार घेत आपल्या पूर्वसुरींनी ॠतुकालात्भव अशी दिनचर्या नेमून दिलेली आहे. शिवाय त्याला दैवी अधिष्ठान दिलेले आहे. या दिवशी भगवान विष्णु निद्राधीन होतात. ही निद्रा चार महिन्याची असते. याला विष्णुशयनी एकादशी असेही म्हणतात आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशीला भगवान जागृत होतात कार्तिक एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात.

चार्तुमास म्हणजे पावसाळा. तो कार्तिकी एकादशीला संपतो. चार्तुमासानिमित्य वेगवेगळी व्रतं करण्याचा नियम फार पूर्वीपासून आहे. त्याच्यामागील कार्यकारणता पाहिली तर ती सहज पटण्यासारखी आहे. हा पावसाळयाचा काळ पाणी दूषित झालेले असते. सूर्यदर्शन कमी सर्वत्र ढगाळ वातावरण यामुळे रोगराई पसरते. पावसामुळे घराबाहेर पडणं शक्य नसायचं. अशा वेळी घरात राहून वेळ घालविण्यासाठी देवाचं नामःस्मरणं केव्हाही चांगलं. तसचं रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयम, खाण्यावर बंधन. या कारणानं कांदा लसूण, वांगी न खाणं असा एक नियम बनविला गेला असेल किंवा एकभुक्त राहणं, नक्त करणं ही व्रतं सुरू झाली असावी असं वाटतं.

- Advertisement -

धार्मिकतेबरोबर सामजिक बािंंधलकी असावी म्हणून कदाचित महिला वर्ग वेगवेगळे नेम आचरितात. जसं बाळभूक देणं म्हणजे चार महिने छोटया बाळाला रोज कपभर दूध देणं. मुलीची वेणी घालून देणं इत्यादी व्रतं. याशिवाय स्वत:वर संयम राखण्यासाठी आवडती वस्तू, एखादा अत्यंत आवडता पदार्थ चार महिन्यासाठी सोडणं. देवासमोर चार महिने गोपद्म काढणं अशी नाना प्रकारची वेतवैकल्ये पूर्वी स्त्रिया करित असत. आजही काळ बदलला स्त्री पुरूषाच्या बरोबरीनं कमावू लागली. सर्व क्षेत्रात आघाडीवर असली तरी तिच्या मनातली आई-पत्नी-बहिण ही मानसिकता कायम आहे. त्यामुळे ती आजही तिला जमतील अशी व्रतं आवर्जून करताना दिसते. कार्तिकी द्वादशीला या सर्वांच उद्यापन केलं जातं. त्या त्या व्रताचं उद्यापन कसं करायचं हेही ठरलेलं आहे. अर्थात यथाशक्ती यथामिलितेनं हे आहेच.

आषाढी एकादशीचं दैवत आहे पंढरपूरचा विठुराया. त्याचं रूपही आषाढातल्या सावळ्या मेघासारखं सावळं; परंतु अत्यंत देखणं आहे. भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी गेलेला विठुराया, आईवडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने त्याच्याकडे न पाहता उभं राहण्यासाठी दिलेल्या विटेवर तो विठुराया त्याची वाट बघत उभा राहिला, तो आजही तिथेच म्हणजे पंढरपुरात उभा आहे अशी एक कथा आहे. तळागाळातल्या भोळ्या भाविकांसाठी तो सतत तत्पर आहे. त्याच्या परिवारात असंख्य भक्तमंडळी आहेत. त्यांना जातीजमातीचं बंधन नाही. या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा असते. भक्तिभावानं सहजप्ररणेनं लाखो लोक दिंडी मिरवित पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. हा सोहळा अवर्णनीय आहे. सातशेहून अधिक वर्षांपासून हा क्रम नित्य चालू आहे. ही दिंडी म्हणजे संताच्या दूरद़ृष्टीचं, धर्म टिकवण्याकरता त्यांना केलेल्या धडपडीचं जिवंत प्रतीक आहे. जसं बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणपती मांडून सर्वसामान्यांना एकत्र केलं, तसंच काहीसं सूत्र धरून संतानी दिंडी सुरू केली असावी, असं वाटतं.

समाजाची एकता, त्याचं सामर्थ्य दाखवणारी दिंडी विठ्ठलाच्या चरणी समर्पित केली. देह जावो अथवा राहो! पाडुंरंगी दृढ भावो!!असा भाव निर्माण केला. प्रतिवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारा तो वारकरी अशी वारकरी या शब्दाची व्याख्या करून वारकरी संप्रदाय तयार झाला. समाजातील सर्व स्तरातील लोकांना माळ देऊन नामःस्मरणाचं महत्त्व पटवून दिलं. त्यांचं जीवन बदलविलं. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी अशी शिकवण दिली. जो वारकरी झाला माळकरी झाला त्यानं दारू प्यायची नाही. कांदा लसूण खायचा नाही. रोज हरिपाठ म्हणायचा अशा प्रकारे समाजात भक्तिभाव वाढवून संतांनी समाजावर अनंत उपकार केले.

आपल्या साहित्यात, संत साहित्यात श्री विठ्ठलाच्या नावाचे गोडवे गाणारे अनेक सुदंर अभंग विराण्या, भारूडं पदं आढळतात. श्री ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत नामदेव, विसोबा खेचर मुक्ताबाई, जनाबाई संतसखुबाई आदींच्या रचना आहेत. शिवाय असे अगणित भक्त आहेत ज्यांनी आपलं परमदैवत विठ्ठलाला स्मरून संतसाहित्य समृद्ध केलेलं आहे. जसा भाव तसा देव, जशी भक्ती तशी वृत्ती आणि सर्वांना आपल्यात सामावून घेण्याची श्री विठ्ठलाची स्वभावप्रवृत्ती. तो सर्वांना आपला वाटतो. त्याला कोणत्याही संकटात बोलाविता येतं. तो सदैव तयार असतो.

प्रसंगी रखुमाईचा रोष पत्करून तो आपल्या भक्तांच्या मदतीला धावून जातो. तो नाम्यासाठी खरोखरंच जेवतो. तो त्याच्या जनीसाठी दळण दळतो. एकनाथाच्या घरी पाणक्या बनतो. आपल्या भक्तासांठी तो लेकुरवाळा विठू होतो. या सार्‍या त्याच्या वृत्तींमुळे तो भक्तमंडळीत प्रिय आहे तो त्यांचा श्वास आहे. तो सतत नित्य त्यांच्या समीप आहे त्याचं नाव घ्यायला ठरावीक वेळ नाही, मोजणी नाही, हरीमुखे म्हणा हरीमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पापपुण्याचा हिशेबसद्धा आपल्याला ठेवायचा नाही. त्याची काळजीदेखील तोच घेणार असा हा विठूराया.

आजही वर्षं उलटलित, दशकं पालटलित पण हरीनामाचा महिमा तसाचं आहे. त्याचं प्रत्यंतर म्हणजे पंढरपूरला जाणारी वारकरी मंडळी दिवसागणिक वाढते आहे. वाढत्या महागाईचा, वेळेची कमतरता, नैसर्गिक आपत्ती असुरक्षितता, याचा परिणाम दिंडीवर होताना दिसला नाही. तेवढ्याच भक्तिभावानं वारकरी वाढत्या संख्येन दिंडीत सामिल होत पंढरपूरला जातात आणि आपल्या दैवताचं दर्शन घेतात. आजही बदलत्या काळात मनातील भाव जागृत ठेवण्याचं काम, संतानी सुरू केलेल्या दिडींच्या रूपानं जनसामान्यांच्या मनात अधिष्ठीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्ष देहरुपानं जाऊन विठुरायाचं दर्शन घेता येत नसलं तरी अंतरीत तो सदैव विसावलेला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या