Thursday, November 21, 2024
Homeशब्दगंधतुमचे मन त्याचा कान होऊ द्या

तुमचे मन त्याचा कान होऊ द्या

– दिपाली खेडकर

मुलाच्या सततच्या आक्रमक वागण्याबद्दल चिंताग्रस्त झालेली आई माझ्यासमोर बसलेली होती. मुलाचे आक्रमक वागणे हे त्याला स्वतःला त्रास देणारे होतेच, पण सोबतच त्याच्या आई-वडिलांना, बहिणीला पण त्रास देणारे होते. शाळेतूनदेखील तक्रारी होत्याच.

- Advertisement -

हे वागणे सार्वत्रिक दिसते आणि याचा दोष मुलांच्या माथी मारून हताश पालक मुलांच्या समुपदेशनाची अपेक्षा करताना दिसतात. मुलांचे समुपदेशन गरजेचे असतेच. पण सोबत पालक, शिक्षक व मुलाच्या भोवतीचे इतरही वडीलधारी मंडळी यांचेही योगदान महत्त्वाचे असते.

मुलांच्या सकारात्मक ऊर्जेसाठी होणार्‍या समुपदेशनात पालकांसाठी येणारे महत्त्वाचे व सातत्याने बोलावे लागणारे विषय इथे मांडत आहेत.

मुलांना लेबल न लावणे – मुलांमधील आक्रमकता कमी करून मुलांमधील ऊर्जेला कसे वळण लावायचे हा सर्व पालकांना सतावणारा प्रश्न आहे. थोडे जरी मुलांकडे दुर्लक्ष झाले, संवाद कमी झाला की काय प्रश्न डोकं वर काढेल ते सांगता येत नाही. यामधून मुलांबद्दल काही भयंकर पालकांना कळले की ते मुलांना लेबल लावून मोकळे होतात आणि मग त्या लेबलच्याच चष्मातून मुलांना बघायला लागतात. म्हणजे एकदा खोटे बोललेला मुलगा कायमचा खोटारडा होतो. एकदा-दोनदा कमी मार्क मिळालेला मुलगा कायमचा ढ होतो. एकदा बोलणे खाणारा मुलगा कायमचाच बोलणे खातो. हे मुलांच्या स्वप्रतिमेसाठी अतिशय हानिकारक आहे जे नकळत पालकांकडून घडत राहते.

अनुभवातून शिक्षण – मुलांची ऊर्जा सकारात्मक असावी, यासाठी पालक सजग असतातच. पण मुले बरे-वाईट हे त्यांच्या अनुभवातूनच शिकतात. पण पालकांना ते अजिबात मान्य नसते. त्यांना मुलांना स्पून फीडिंग करण्यामध्ये जास्त आनंद वाटत असतो. कोणत्याही प्रश्नाचेे प्रत्येक आई-वडिलांकडे उत्तर असते व हे उत्तर मुलांनी ऐकावे अशी त्यांची अपेक्षा असते आणि अशी माहिती उत्तर मुलांना ऐकायला अजिबात आवडत नसते. त्यांना त्यांचे प्रयोग करून बघायचे असतात. त्यांचे निर्णय घ्यायचे असतात. मग मुले पण पालकांना ीशश्रशलींर्ळींश लीळशषळपस करतात. पूर्ण सत्य सांगत नाहीत. स्वतःबद्दल तसेच मित्रांबद्दल जे लपवायचे ते बरोबर लपवतात.

भावना व्यक्त करणे – डोक्यात येणारे बरे वाईट विचार हे व्यक्त करण्यासाठी मुलांना लहानपणापासून प्रोत्साहन द्यायला पाहिजे, कारण आपल्याला जे वाटतेय ज्या भावना आपल्याला जाणवत आहेत त्या जर शब्दांमध्ये व्यक्त करता नाही आल्या तर व्यक्तीची आतल्या आत घुसमट होते आणि त्याची विचार करण्याची क्षमता या सगळ्या वैचारिक व भावनिक गोंधळामुळे कमी होते. यासाठी लहानपणापासूनमुलांना भावना व्यक्त करण्याची सवय लावली पाहिजे. मुले भावना व्यक्त करतातही, पण जेव्हा पालक त्या गोष्टी ऐकतात तेव्हा त्यांच्या रिअ‍ॅक्शन तीव्र अस्तात. इथे पालक आणि मुलांमध्ये र्लेााीपळलरींळेप सरि तयार होतो. मुले पालकांपासून दुरावण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. म्हणून पालकांनी योग्य- अयोग्य, भले बुरे मुलांच्या मनातले सगळे विचार शांत आणि तटस्थ व्यक्तीने ऐकायची सवय ठेवली पाहिजे आणि त्या प्रत्येक विचारावर शांतपणे आणि समंजसपणे मार्ग काढायला मुलाला शिकवले पाहिजे. ही शांतता येण्यासाठी आधी पालकांनी स्वतःवर काम करायला हवे. पालक होण्याची ही सगळ्यात मोठी पहिली जबाबदारीची पायरी आहे. मुलांचे कितीही गंभीर विषय, प्रॉब्लेम आले तरीही न बघता पालकांना ही माहिती असायला हवे की, मी माझ्या मुलाच्या अशा वागण्यामागचे कारण काय आहे, तसेच त्याला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यास काय मदत करावी लागेल ते पाहणे हा पालकांचा खंबीरपणा खूप महत्त्वाचा आहे. मुलाला बर्‍या-वाईटाचे शाब्दिक लेक्चर देण्यापेक्षा आलेल्या संकटावर मिळून उत्तर शोधणे आवश्यक असते.

मुलांच्या वेळेचे आणि ऊर्जेचे नियोजन – मुलांच्या आयुष्यात वेळ आणि ऊर्जा या दोन गोष्टी भरभरून असतात. त्याचे नियोजन त्यांना समजून सांगणे खूप महत्त्वाचे ठरते. मित्र, मोबाईल, पैसे यांच्या संगतच्या चांगल्या-वाईट परिणामांची त्यांना कल्पना देणे आवश्यक आहे. मुलांच्या आयुष्यात ध्येय नसणे याने मुलांवर दूरगामी दुष्परिणाम होतात. शाळकरी वयामध्ये मुलांना अभ्यास, खेळ, वाचन, कला यांचे काही ना काही ध्येय असले पाहिजे. जेव्हा मुलांच्या समोर काही टार्गेट नसते तेव्हा असलेल्या वेळेचे काय करावे याचे मुलांना उत्तर मिळत नाही आणि मग जे सुचले ते, जे वाटेल ते असे मोघम मुले वागत चालतात. त्यामुळे विधायक कारणांसाठी मुलांचा वेळ घालवण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. त्यासाठी वेळ काढला पाहिजे.

संवाद क्षमता – शेजारी, नातेवाईक आणि घरी येणारे पाहुणे यांच्यासोबत काहीच न बोलण्याची सवय मुलांमधे दिसून येते. जितका मुलांचा संवाद आजूबाजूच्या लोकांशी, घरच्यांशी, नातेवाईकांशी असतो तितके वेगवेगळे अनुभव, बर्‍या-वाईटाचे परिणाम, जगाची रीत याबद्दल मुलांची समज वाढत जाते. बर्‍याचदा असे दिसून येते की, बोलकी मुले आनंदी, उत्साही व सहज संवाद साधणारे असतात. काही मुले अशीपण असतात जी फार बोलत नाहीत पण एक ठराविक संवाद समोरच्या व्यक्तीशी साधू शकतात. पण काही मुले त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन अजिबातच बोलत नाहीत. शक्यतो अशा मुलांचा वर्तणुकीसंबंधित तसेच त्यांच्या स्वप्रतिमेविषयी काही ना काही प्रश्न भविष्यात समोर येतो. मुलांच्या बोलण्यामध्ये सहजता आणण्यासाठी पालकांच्या वागण्यातसुद्धा सहजता असली पाहिजे. घरातील हलकेफुलके वातावरण, मोकळा संवाद, आपल्या प्रॉब्लेमबद्दल मोकळ्या मनाने बोलणारे आई-वडील हे मुले जितके बघतील तितके मुलांमध्ये त्यांच्याही प्रॉब्लेमबद्दल बोलण्याची सहजता येईल. मुलांनाही याची जाणीव होते की जसे आपल्याला आहे तसे आपल्या आई-वडिलांनादेखील प्रॉब्लेम आहे आणि तेही त्याचे उत्तर शोधण्यासाठी धडपडतात. यामुळे मुले पालकांकडे पालक म्हणून जसे बघतात तसेच ते त्यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून पण बघायला शिकतात. पालकांचे नातेवाईकांशी व मित्र-मैत्रिणींशी असलेले नाते बघून त्यांनाही या नात्यांमध्ये विश्वास तयार होतो.

मुले-पालकांमधील दरी अशा संवादाच्या माध्यमातूनच कमी होऊ शकते, त्यानेच त्यांच्यातील विश्वास वाढतो व त्यांच्या आयुष्याला सकारात्मक वळण लागते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या