Saturday, July 27, 2024
Homeनाशिकचला रानभाज्या खाऊया!

चला रानभाज्या खाऊया!

नाशिक । मयूर जाधव Nashik.

पावसाळा सुरू झाला की रानमाळावर रानभाज्या उगवायला सुरुवात होते. कोणतीही शेती न करता निसर्गाची देणगी या ऋतूमध्ये आपल्याला बघायला मिळते. आरोग्यदायी, आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक या भाज्या आदिवासी भागाची ओळख असून या भाज्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अनेक भाज्यांचा आपल्याला परिचय नसून आपण कधीही न पाहिलेल्या भाज्या अनेक प्रकारचे आजार, रोगराई दूर होण्यापासून मदत होण्यासाठी आऱोग्यास गुणकारी आहेत. यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटिन, सॅपोजेनिन, सॅपोनिन, सोडियम,पोटॅशियम, कॅल्शियम आदी प्रोटीन यापासून मिळतात. या रानभाज्यांची ओळख करून घेऊया.

- Advertisement -

केना : ‘अ’ जीवनसत्व मिळण्यासाठी ही भाजी फायदेशीर आहे. या भाजीपासून पराठा बनवतात.

टाकळा : टाकळ्याची भाजी उष्ण असते. त्यामुळे वात आणि कफदोष कमी होतो. तुरट चवीची ही भाजी मेथीच्या भाजीप्रमाणे बनवता येते. या भाजीने पोट साफ होते व त्वचारोग कमी होण्यास मदत होते.

करटोली : थोडीशी कडवट चवीची अशी भाजी यकृतासाठी उपयोगी आहे. पोट साफ होते आणि मुळव्याधीचा त्रासही कमी करते. करटोली काटेरी कारल्यासारखी दिसतात.

कुर्डू : ही भाजी लघवीच्या समस्या कमी करते. जुनाट खोकला, कफ कमी करण्यास मदत होते. गुणकारी भाजी म्हणून या भाजीची ओळख आहे.

स्टार फ्रुट : मधुमेहाचा आजार कमी करण्यासाठी या फळाचे फायदे आहेत. ह्या ऋतूमध्ये प्रामुख्याने खाण्यास मिळते.

कोरळा : या भाजीला फोडशी कुळी किंवा कुबळी म्हटले जाते. लांबट पातीसारखी ही भाजी असते. या भाजीपासून थालिपीठ बनवतात. अतिशय चवदार असते.

तांदुळका : या भाजीचे नियमितपणे उत्पादन घेतले जाते.आधुनिक बियाणांपासून या भाजीचे उत्पादनदेखील घेतले जाते. परंतु या दिवसांमध्ये रानमाळावर उगवलेल्या या भाज्यांची चव वेगळीच असते. श्रावण महिन्यातील सणांमध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी या भाजीचे महत्त्व अधिक आहे.

चू-चू : पोटातील आंबट पाणी व उलट्या कमी होण्यासाठी या भाजीचा वापर करतात .

झारझुरे : रक्तवाहिन्या शुद्ध करण्यासाठी ही भाजी खाल्ली जाते. मेथीच्या भाजीप्रमाणे ही भाजी शिजवली जाते.

कोकुर्ते : हाडं मजबूत करण्यासाठी मदत होते. प्रामुख्याने श्रावण महिन्यात ही भाजी येते.

वरकंद : वरकंद हा पावसाळ्याच्या दिवसातच बघायला मिळतो. खाण्यासाठी अतिशय उपयुक्त असून हे उकडून किंवा भाजी बनवून खाल्ले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या