Monday, June 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजपाणीप्रश्न सोडविण्यासाठी मतभेद विसरून एकत्र या- शरद पवार

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मतभेद विसरून एकत्र या- शरद पवार

दिंडोरी । वार्ताहर

- Advertisement -

जिल्ह्यातील पाणी गुजरातला जात असून जिल्ह्यात पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सिंचन पुर्तता करण्यासाठी एकाच व्यासपीठावर सर्वांनी मतभेद विसरुन एकत्र येऊन पाणी समस्येचे निराकरण करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांंनी केले.

वणी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. रात्री साडेआठ वाजता शरद पवार यांचे आगमन झाले व सुमारे पंधरा मिनीटांच्या भाषणात त्यांनी अनेक मुद्याना हात घातला. शरद पवार पुढे म्हणाले की, या जिल्ह्यातील पाणीप्रश्न महत्वाचा आहे. मात्र जिल्ह्यातले पाणी गुजरातला जात असेल तर राज्यातील नेतृत्व काय करते आहे.नाशिक जिल्ह्यावर हा अन्याय आहे.

पाण्याचा विषय अभ्यासपूर्ण आहे. जलतज्ञ बोलवावे, वाहून जाणारे पाणी अडवायचे कसे या विषयी अभ्यास करावा. निवडणूक संपल्यानंतर यावर सर्वांनी आग्रह धरा. चांदवडमध्ये शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत. अनेक तालुक्यात आज पाणी नाही.हा प्रश्न सोडवायचा कोणी? असा प्रश्न उपस्थित करून पवार पुढे म्हणाले की, आज देशाचे पंतप्रधान इथे आले. नेहमीप्रमाणे भाषण केले. ते भाषण मी ऐकले. नरेंद्र मोदी हे देशातील पहिले असे पंतप्रधान आहे जे देशात विविध जाती धर्मामधील ऐक्य निर्माण करण्याऐवजी अंतर कसे वाढेल अशी भूमिका घेतात.त्यांना जनतेच्या प्रश्नांशी घेणेदेणे नाही.

पवार पुढे म्हणाले की, सर्वसामान्य लोकांमधील भगरे सर यांना लोकसभेत पाठवा. तुमच्या जिल्ह्यातील दोन जागा राजाभाऊ वाजे, आणि भास्कर भगरे यांना निवडून द्या ही विनंती करण्यासाठी आज इथे आलो आहे. 1980 साली या जिल्ह्यातील सगळ्या जागा आमच्या पक्षाच्या निवडून आल्या होत्या. ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे रावसाहेब थोरात यांचे आज स्मरण होते आहे. शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्वाची कामगिरी त्यांनी केली. मविप्रचे संस्थापक याच गावचे आहेत ही अंत:करणात आहे.त्यांची परंपरा कायम राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी तुतारी वाजवून स्वागत केल्यानंतर मान्यवरांसहे उमेदवार भास्कर भगरे यांनी मनोगत व्यक्त केले.आभार दत्तात्रेय पाटील यांनी मानले.

काळ्या आईशी इमान राखणारा हा जिल्हा
लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा हा महत्वाचा आहे. आदिवासी आणि शेतकर्‍यांनी शिरूरमध्ये उत्साहाने मतदान केले. काळ्या आईशी इमान राखणारा हा जिल्हा आहे. शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या जिल्ह्यातील तरुण शेतकरी करत आहे. सह्याद्री संस्थेची आठवण होत आहे. या जिल्ह्याचा नावलौकिक अनेकांनी केला आहे. हा जिल्हा आदिवासींचा आहे. जल, जंगल या देशाची संपत्ती आहे. या तिन्ही संपत्तीचा मालक हा आदिवासी आहे,असेही पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या