मनमुराद भटकंती करताना कोणताही हेतू ठेवला गेला नसला तरी असा प्रवासच आपल्याला बरेच काही शिकवून जातो. आपल्यालाच आपली नव्याने ओळख होते. जीवनाचे धडे आपल्याला अशी भटकंतीच देते.
आपले दैनंदिन जीवन दुपारच्या आळसावल्याप्रमाणे एकसुरी झाले असेल तर जीवनात थोडाबहुत रोमांच भरण्याची गरज असते. असा रोमांच आपल्याला प्रवासातून, भटकंतीतून मिळू शकतो. आपले जग, आपला देश, आपला परिसर जवळून जाणून घेण्याची संधी भटकंती आपल्याला देते आणि त्यामुळे आपण आतून सचेतन होतो.
इतिहास असे सांगतो की, भारत किंवा अमेरिकेसारखे जगातील प्रदेश जगाच्या ध्यानात आणून देण्याचे काम सर्वप्रथम फिरस्त्यांनीच केले आहे. आजन्म केलेल्या भटकंतीमुळे, प्रवासामुळे, मुशाफिरीमुळेच वॉस्को-द-गामा, कोलंबस, फाहियान, व्हेन्सांग अशा प्रवाशांची नावे जगाच्या इतिहासात अजरामर झाली. एक काळ असा होता जेव्हा दूरच्या प्रवासासाठी केवळ समुद्रमार्गानेच जावे लागत असे आणि त्यासाठी समुद्रावर चालू शकणारे जहाज हेच एकमेव साधन होते. परंतु त्याहीवेळी प्रवास करणारे आणि प्रवासाचे महत्त्व जाणणारे संख्येने कमी नव्हते. पुस्तके उपलब्ध नव्हती तेव्हा इतर देश, इतर भूभाग याविषयी जाणून घेण्याचे प्रवास हेच एकमेव माध्यम होते. एकमेकांच्या संस्कृती जाणून घेण्यासाठी फार पूर्वीपासून लोक भटकंती करत आहेत. जेव्हा आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी माणूस एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी भटकू लागला तेव्हाच प्रवास ही संज्ञा अस्तित्वात आली. वस्तूतः माणूस आधी फिरस्ताच होता आणि शेतीचा शोध लागल्यानंतर तो स्थिर झाला.
परंतु भटकंतीचे महत्त्व वाढण्याचे सर्वात ठळक कारण म्हणजे माणसाने शारीरिक गरजांइतक्याच मानसिक गरजा पूर्ण करणे आवश्यक मानले. प्रवास करणे केवळ पोट भरण्यासाठीच नव्हे तर काही शिकण्यासाठी, समजून, जाणून घेण्यासाठी आणि चेतना जागवण्यासाठी आवश्यक आहे, हे माणसाला समजून चुकले. सामान्यतः देशाटन, तीर्थाटन, ज्ञानार्जन, मनोरंजन अशा कारणांसाठी भटकंती केली जाते. परंतु नकळत का होईना प्रत्येक प्रवास आपली सौंदर्यदृष्टी विकसित करण्याबरोबरच जगाशी, समाजाशी आणि निसर्गाशी आपल्याला जोडून ठेवण्याचे काम करतो. जीवन हे गतिशीलतेचे दुसरे नाव आहे, हे विधान सत्यात उतरवण्याचे काम प्रवासच करतात. प्रवासामुळे माणूस समृद्ध होऊ शकतो. प्रवास आपल्याला शिकण्याच्या उत्तमोत्तम संधी प्रदान करतात. प्रवासात आपल्याला प्रात्यक्षिक ज्ञान मिळते. आजच्या धावपळीच्या युगात प्रवासाचे मानसशास्त्रीय महत्त्व वाढले असून सर्वकाळ कुटुंबासोबत राहण्याचा तो एक मार्ग बनला आहे. आज आपण जे आयुष्य जगतो आहोत, त्यात मुलांना भौतिक सुखे मिळवून देण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. परंतु एकाच छताखाली राहत असूनही आई-वडिलांशी मुलांचा संवाद जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. आई-वडिलांना मुलांशी आणि मुलांना आई-वडिलांशी बोलण्याची संधीच मिळत नाही. अशा स्थितीत प्रवास हा मुलाबाळांसमवेत राहण्याचा, त्यांच्या सान्निध्यात राहण्याचा आणि त्यांच्याविषयी असलेली ओढ प्रकट करण्याचा एक मार्ग ठरतो. कोणत्याही अनोळखी ठिकाणी प्रवासाला जाण्यास निघण्यापूर्वी आपल्या डोळ्यांसमोर त्या ठिकाणाचे एक चित्र निर्माण होते. हे चित्र काल्पनिक असते. कोणतीही अनोळखी वस्तू, अनोळखी जागा, वेगळी भाषा आणि वेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये पोहोचल्यानंतर आपल्या अनुभवांच्या पोतडीत अनेक मौलिक रत्ने जमा होतात. प्रवासामुळे आपण बाह्यजगाबरोबरच आपल्या आतील प्रेरणांचीही ओळख करून घेऊ शकतो. चंद्र आणि मंगळाचीही माहिती जाणून घेणारा माणूस स्वतःलाच ओळखत नाही, हे ऐकून कदाचित धक्का बसेल, पण ते खरे आहे. मोठमोठ्या गोष्टी जाणून घेणारा माणूस अनेकदा सूक्ष्म गोष्टीच जाणून घेण्यात कमी पडतो. आपला आनंद, आपले सुख, आपल्या इच्छा, आपले आवेग हे जाणून न घेणारा माणूस केवळ आपले करिअर आणि काम या दोन गोष्टींमागे धावताना बरेच काही मागे सुटून जाते. या सुटून गेलेल्या गोष्टी एकत्रित करण्यात प्रवास आपल्याला मदत करतात. जगाचा शोध घेण्यापूर्वी स्वतःचा शोध घेण्यास भाग पाडतात. आपल्याला खरा आनंद कशात आहे, हे घराबाहेर पडल्याखेरीज समजत नाही. आजकाल प्रवास बर्याच वेळा आपले विश्व बदलण्यासाठी केले जातात. काही गोष्टी विसरण्यासाठी तर काही गोष्टी नव्याने आत्मसात करण्यासाठी प्रवास केला जातो. जीवनशैलीतील धावपळ, वेळ नसणे, मानसिक थकवा हे सर्व विसरण्यासाठी लोक वेळ मिळताच प्रवासाला निघतात. मनाला शांतता आणि स्थैर्य मिळेल असे ठिकाण निवडून त्याकडे धाव घेतात. लंडन, जगातील अनेक शहरे पाहण्याचे औचित्य असेल. परंतु अस्सल सुख, शांतता आणि समाधान निसर्गाच्या कुशीत गेल्यावरच मिळते. हेही अगदी नैसर्गिक आहे. कारण आपले शरीर निसर्गातील घटकांपासूनच बनलेले आहे आणि जेव्हा आपण निसर्गाशी स्वतःला जोडून घेतो तेव्हा आपण स्वतःलाच नव्याने भेटतो. जग जाणून घेण्याबरोबरच स्वतःला जाणून घेणे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते.
भटकंती म्हणा किंवा आऊटिंग, त्याचे स्वरूप आता बरेच बदलले आहे. काळाबरोबर प्रवासाच्या स्वरुपात आजकाल खूपच बदल झाला आहे. एक काळ असा होता जेव्हा प्रवास आपल्याला माहीत नसलेल्या ठिकाणी जाण्याचे एक साधन होता. एक दिशा निश्चित करून लोक घराबाहेर पडत असत, मात्र त्या मार्गावर काय-काय मिळेल हे सांगणे शक्य नव्हते. वेगवेगळे अनुभव प्रवासात येत असत आणि त्यापैकी अनेक अनुभवांची कल्पनाही केली जात नसे. आजकाल प्रवासाला आपण पर्यटनाचे नाव दिले आहे. व्हिसा घेऊन लोक एका देशातून दुसर्या देशात पर्यटनासाठी जातात. त्यांना आपण काय पाहायला चाललो आहोत, हे आधीपासूनच माहीत असते. त्या ठिकाणापर्यंतचे अंतर आणि तेथील परिस्थितीचीही माहिती असते आणि तयारी करूनच लोक घराबाहेर पडतात. आधीच नियोजन होत असल्यामुळे प्रवास आता खूपच सुखावह झाले आहेत. परदेशात हॉटेल महागडी असतील तर लोक एखाद्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहू शकतात. सर्व प्रकारचे बुकिंग ऑनलाईन होऊ शकते. त्याऐवजी घरातून निघाल्यापासून पुन्हा घरी परत येईपर्यंत सर्व जबाबदारी उचलणार्या ट्रॅव्हल कंपन्याही खूप आहेत. पण आपल्याला त्यासाठी पैसे मोजावे लागतात.
देशात बाहेरून येणार्या पर्यटकांची आणि देशाबाहेर जाणार्या देशी पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. अर्थात, आनंदाबरोबरच अनुभव घेणे हा प्रवासाचा हेतू मागे पडता कामा नये आणि नवनवीन ठिकाणांच्या शोधाबरोबरच स्वतःचा शोधही महत्त्वाचा मानायला हवा.