Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखउष्णतेच्या प्रकोपाचा सांगावा

उष्णतेच्या प्रकोपाचा सांगावा

फेब्रुवारी महिना गेल्या 147 वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरल्याचे सांगितले जाते. आगामी तीन महिनेही उष्णतेच्या लाटांचे असतील असा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला आहे.

हवामान खात्याचे पावसाविषयीचे अंदाज समाजमाध्यमांवर विनोदाचा विषय ठरतात. तथापि उष्णतेच्या लाटांच्या अंदाजाचा अंदाज लोकांना गेल्या महिन्यातच आला आहे. दिवसा त्वचा भाजून काढणारे ऊन आणि पहाटे गारवा अशा विषम हवामानाचा अनुभव लोक सध्या घेत आहेत. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. अनेक कारणांमुळे हवामान कमालीचे लहरी बनत आहे.

- Advertisement -

उष्णतेच्या वाढत्या प्रकोपात भारताला विशेष गंभीर परिणाम सहन करावे लागतील असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. तोच अनुभव सध्या लोकांना येतो. पाऊस लहरी, उष्णतेच्या लाटा आणि थंडी गायब. महागाई वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण तरीही निसर्गाचे मनमानी दोहन सुरुच आहे. जंगलांचा र्‍हास, निसर्गाच्या रचनेत विकासाच्या नावाखाली हस्तक्षेप, भूजलाचा वारेमान उपसा आणि कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन सुरु आहे. उष्णतेची लाट एकटी येत नाही. ती बरोबर अनेक समस्यांचा फेरा आणते. कृषी उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होतो.  

धरणांमधील जलसाठ्याचे बाष्पीभवन होते. जलसाठा वेगाने कमी होतो. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई जाणवायला लागते. त्यात वणव्यांची भर पडते. तापमानातील वाढ वातानुकुलित यंत्रांची मागणी वाढवते. ऊर्जेचीही मागणी वाढते. त्याप्रमाणात उत्सर्जनही वाढते. मानवी आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. उष्माघाताच्या घटना वाढतात. त्यामुळे मृत्यूही संभवतो. जागतिक हवामान बदलावर जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे अधूनमधून माध्यमात प्रसिद्ध होत असते. केंद्र आणि राज्य सरकारेही वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा आखतील आणि त्याची कठोर अंमलबजावणीही करतील अशी अपेक्षा जनतेने करावी का? यावर्षी हंगामी पावसावर अल निनोचे सावट आहे.

याविषयी आत्ताच काही अंदाज व्यक्त करणे घाईचे ठरु शकेल असे काही हवामानतज्ञांनी म्हटले आहे. तरीही धोक्याची शक्यता नाकारली जाऊ शकेल का? उष्णतेच्या लाटांचा आणि एकुणच भविष्यातील संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकही त्यांच्यापरीने सज्ज राहू शकतील. उष्माघात कसा टाळायचा याचे सल्ले तज्ञ देतात. ते अंमलात आणता येऊ शकतील. लोक नकळत पाण्याची वारेमाप उधळपट्टी करतात. ती टाळून पाणी जपून वापरण्याची सवय आत्तापासुन अंगी बाणवावी लागेल.

वीजेचा योग्य वापर उत्सर्जन कमी करु शकेल. पावसाचे पाणी साठवण्याचे नवनवे मार्ग शोधता येऊ शकतील. जेणेकरुन भूजल पातळी वाढेल. पुर्वी बहुतेक ठिकाणी स्थानिक जलस्त्रोत परिसराची तहान भागवत. उदाहरणार्थ बारव, तलाव किंवा विहिरी. असे जलस्त्रोत शोधून त्यांचे बळकटीकरण करता येऊ शकेल. त्यांचे प्रदुषण टाळता येईल. योग्य ठिकाणी देशी वाणाची झाडे लावता येतील. त्यांचे संवर्धन करता येईल. उष्णतेच्या लाटांचा हवामान खात्याचा अंदाज दुर्दैवाने खरा ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. त्याचे विपरित परिणाम टाळण्यासाठी सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर आत्तापासून सज्जता राखलेली बरी, हाच वाढत्या उष्णतेचा सांगावा आहे. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या