मोहनदास भामरे , 98505 15422
श्रीयुत राजमान्य राजश्री (श्री.रा. रा.) आदरणीय सदानंद गुरुजी राहणार पारोळे यांसी शिरपुरहुन मोहनदास भामरे यांचा शिरसाष्टांग नमस्कार..(शि.सा.न)
विनंती विशेष, आपले 29/8/21 चे पत्र मिळाले.खुलासा कळला. वाचुन खुप आनंद झाला.म्हणून ऊलट टपाली हे पत्र लिहीत आहे,
गुरुजी,
जुन्या जमान्यातल्या अशा मायन्याची पत्रे, हे नवीन पिढीसाठी जरा वेगळेच वाटेल. आता जग बदलले.दुनिया मुठ्ठीत आली.
धावत्या जगात अशा साग्रसंगीत मायन्याची अपेक्षा ही नाही. आता तर निमिषार्धात संदेशांची देवाण घेवाण होते.
रिसीव्हड.
फाईन.
ओ.के.
अशा शब्दात सारी पत्र संस्कृती सिमित झालीय.
कालाय तस्मै नमः पण
ह्या जुन्या संस्कृतीची आपण जपणुक करताहेत म्हणुन तुमचे मनापासुन कौतुक करतो,
हे पांच, पन्नास पैशाचे पोष्टकार्ड, पण किती लांबून लांबून आपल्या पर्यंत यायचे.
मुलगी सासरी गेली, मुलगा नोकरीवर गेला, आई वडील मजेत आहेत, पाणी पाऊस चांगला आहे.
पीके चांगली आहेत. अशा ख्याली खुशाली पासुन तर मरण धरणच्या दुःखद समाचारापर्यंत..
अशा मजकुराची पत्रे तीन चार दिवसात येवून पोहचायची.
पो ष्ट म न ऽऽ
ही हाळी ऐकली की कोण आनंद व्हायचा?
अधाशासारखं ते वाचायचो.
आम्हाला कुणाच नातेवाईकांची पत्रे येत नसत,
पोष्टमन काका पाहीले की मलाही ओढ लागायची.पत्र येत नाही म्हणुन मी हिरमुसला व्हायचो.
तेंव्हा आई म्हणायची नातलग पत्रे पाठवतात.गरीबीला नाती नसतात बाळा.
त्यावेळी कळायचे नाही. पण आता कळते. मग मी आजुबाजुच्या अडाणी लोकांंची पत्रे त्यांना हौसेने वाचुन दाखवायचो. दोन दोन, तीन तीन वेळा.
घरातल्या सर्वांजवळ सेपरेट सेपरेट वाचायचो. त्या बदल्यात मला शेंगा, चिंचा, गुळाचा खडा, कधी लिमलेटच्या गोळ्या बक्षिस मिळायच्या.
पण गुरुजी,
ती पत्रे वाचनातुनच माझे वाचन सुधारले.
कुणाच्या पुत्र प्राप्तीचा समाचार ज्या आनंदाने सांगायचो तितक्याच दुःखाने मयताच्या संदेशाचे अर्धे पत्र रडुन वाचयचो. मला हे शिकायला मिळाले.
कागदावरची अबोल शब्दे समोरच्या हृदयात कशी बोलकी करायची याचे प्रशिक्षण मिळाले.आज मी जो काही आहे ते सारं या जुन्या संस्कृतीची देण आहे,
माझ्या या ईवल्याशा ईमारतीचा पाया या संस्कृतीत रचला गेला म्हणूनच आज मी हळवेला होवुन तुम्हाला पत्र लिहीत आहे.
गुरुजी,
किती छान तुमचे मन आहे.
दै.देशदूत चा पेपर वाचुन
आठवणीने तुम्ही पत्र पाठवले.
पेपराचं नाव, तारीख, पान नंबर, पॅरीग्राफ नंबर, ओळ नंबर सह तुम्ही पोष्टकार्डवर अभिप्राय पाठवतात, पोष्टाचं पत्र या चकाचौंध दूनियेत हरवत असतांना किती मायेने व प्रेमाने तुम्ही ते पाठवतात.
यासाठी मनाची ऊत्तुंगता तर लागतेच पण संस्कारांचे अधिष्ठाण ही लागते. दुसर्याला मोठं म्हणनं, चांगलं म्हणनं, कौतुक करणं, व रसभरीत प्रतिक्रिया देणं याला खरच हे अधिष्ठान लागते.
म्हणुन तुमच्या आचार विचार संस्कारांना वंदन गुरुजी
वंदनच- ज- ज
तुमच्या सारख्या जेष्ठ व निस्वार्थ निरागस तपस्व्याने दिलेला असा आशीर्वाद हाच खरा पुरस्कार.
बाकीच्या पुरस्कारांबद्दल म्या ईवलासा पामर काय बोलणार?
पण तुमच्या अंतःकरणातर्या या पाण्याची प्रचिती जागोजागी लाभली.
किती तरी पत्रे तुम्ही लिहितात. त्या पत्रांच्या उत्तरांची वाट पाहतात. आणि सारी पत्रे प्राणापलीकडे जपुन ठेवतात.
गेली 45 वर्षे हा छंद जपत हज्जारो पत्र तुम्ही संग्रह करुन ठेवलीत.लहान मोठ्यांना पत्र लिहीलीत.. सुंदर बारीक अक्षरातली ती पत्रे म्हणजे आदर्श नमुना.
तसच पोस्ट ऑफिस म्हणजे खर्या अर्थाने सेवाभाव जपणारा विभाग, तसं पाहिलं तर आज एका पोस्ट कार्डाचं मॅन्युफॅक्चरिंग मूल्य हे तब्बल साडेसात रुपये असून देखील केवळ पन्नास पैशांमध्ये आपल्याला पोस्ट कार्ड ची सेवा घरपोच मिळते यातूनच पोस्ट ऑफिसचा सेवा भाव दिसून येतो.. म्हणुन पोष्टखात्याला व पोष्टमनला ही वंदन करतो.
गुरुजी,
स्वार्थ साधुन, माणसांना वापरुन त्यांना भिरकावून देणार्या या युज अँड थ्रो च्या जमान्यात तुम्ही ही निर्जीव पत्रे ही जपुन ठेवतात.. वाह भै वाह,
असा छंद म्हणजे जगाच्या दृष्टीने वेडेपणाच.. पण असे वेडेपणच ईतिहास जपुन ठेवते. संस्कृती सांभाळुन ठेवते, चाली रीती रुढी परंपरा प्रवाही ठेवते, म्हणुन याला माझाा प्रणाम,
गुरुजी,
माफ करा हो.
मी या पत्रांना निर्जीव म्हणालो.
सॉरी सर..
ही निर्जीव नाहीतच. ती तुमच्यासाठी तुमची लेकरेच.. यात किती किती भावभावना आहेत.
कुठे मरण धरणाचे अश्रुंचे पाट आहेत.
तर कुठे पुत्र प्राप्तीचे, बारशाचे, विवाह बंधनांचे आनंदाचे झरे ही आहेत.
या प्रत्येक भावनेत तुम्ही रमतात. म्हणुनच ही पत्रे तुमचे जीवलग आहेत. प्राण आहेत. म्हणूनच तर तुम्ही हा ठेवा प्राणापलीकडे जपतात.
या पत्रात तुम्ही माझ्या लिखाणाचे भरभरुन कौतुक केले.
बरं वाटलं गुरुजी.
अशा 80 वर्षांचे तपस्वी पाठीवर हात ठेवतात तेंव्हा हत्तीचे बळ मिळते,
गुरुजी,
आज शिक्षक दिन,.
तुमच्या सारख्या गुरुशी बोलण्याचा योग आला.असे आदर्श गुरुजीच समाजाचे धरोहर असतात.प्रत्येकाची कार्याची दखल घेतली जातेच असे नाही.काही काजवे आपल्या ईवल्याशा प्रकाशाने लुकलुकत अंधःकाराला चिरुन ऊजेड देत असतात.पण या झगमगाटी दुनियेत ते अदृश्य असतात. अशा काजव्यांना मी प्रणाम करतो. कुणी पुरस्कार देवो न देवो पण आमच्या सारख्या सामान्य हृदयातुन प्रकटणारा अस्सल पुरस्कार मात्र तुमच्या चरणी अर्पण करतो. अशा सर्व गुरुजींना मी वंदन करुन शुभेच्छा ही देतो.
गुरुजी,
तुमच्या पत्रात तुम्ही
गौरव बद्दल आस्थेने चौकशी केलीय
त्याचे शिक्षण, नोकरी, लग्न, सुन, मुले बाबत विचारणा केलीय.
काय सांगु गुरुजी?
अंकाच्या डावी कडे असलेल्या शुन्याची किंमत शुन्य असते.
पण तोच उजवीकडे बसला की अंकाची किंमत पटीने मोठी होत जाते.
गुरुजी, सारच डावी कडचे शुन्य हो,
पण एक सांगु? आमच्यासाठी ती शुन्य ऊजवी कडची लाख मोलाची शुन्य आहेत. दिसायला शुन्य असली तरी त्यांच्या आस्तित्वाने आमची किंमत हजारो पट मोठी होते.
ते जपतोय… प्राणापलीकडे!
बाकी सर्व क्षेम कुशल.
तीर्थरुप (ती.) आई वडीलांचा,
तीर्थस्वरुप (ती.स्व) वडीलधार्यांचा,
गंगा भागिरथी (गं.भा.) आजींचा आशीर्वादाने सर्व सुखरुप आहे.
सौभाग्यवती (सौ.) ची साथ आहेच,
मोठ्यांना नमस्कार.
लहानांना आशीर्वाद,
कळावे लोभ असावा.चुक भुल देणे घेणे. (चु.भु.दे.घे.)
ताजा कलम- (ता.क.) नवीन पिढीला हे जुने शॉटकट शब्दांच्या फुल फॉर्मची ओळख राहावी म्हणुन कंसात ती दिली आहेत.
पुन्हा त्रिवार वंदन गुरुजी
-तुमचाच आज्ञाधारक
मोहनदास भामरे , 98505 15422