Sunday, November 24, 2024
Homeब्लॉगशिक्षणातून साक्षरता

शिक्षणातून साक्षरता

शिक्षणाचं मुळ उददीष्ट काय? तर सुजान नागरिक निर्माण करणे हे आहे. कोणत्याही देशात सुजाण नागरिक निर्माण करणे घडत गेले की राष्ट्र प्रगतीचे दिशेने घेऊन जाणे घडत जाते. शोध, संशोधने, उद्योग, साहित्य,कला, विज्ञान या सा-या सर्व क्षेत्रात प्रगती होत असली आणि आर्थिक विकासाचे आलेख कितीही उंचावत गेले तरी त्या प्रगतीचे उत्तम फळे चाखायची असेल तर उत्तम व सुजाण नागरिक देशाच्या भूमित असायला हवेत.

देशाचे मनुष्यबळ म्हणजे केवळ गर्दी असे नसून, ती राष्ट्र व समाज समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीतीत विचाराची शक्ती असायला हवी. आज आपण प्रगती करतांना आपल्या अवतीभोवती जे काही घडते आहे ते पाहिले की आपण पेरलेल्या शिक्षणातून काय साध्य केले हा प्रश्न पडतो. स्वातंत्र्यांच्या नंतर सत्तर बहात्तर वर्षात शिक्षणांची गंगा सर्वदूर पोहचली. साक्षरतेचे प्रमाण देखील वाढले. नागरिक अधिक उच्च शिक्षित होण्याचे प्रमाण देखील उंचावले. पण हे घडतांना या देशात पोलीस, न्यायालये आणि तुंरूगांची संख्या देखील वाढते आहे हे विसरता येत नाही. ही संख्या वाढत जाते तेव्हा समाज उन्नत बनला आहे असे म्हणता येत नाही. शिक्षणातून साक्षरता वाढत असतांना पोलीसांच्या संख्येचा आलेख वाढत राहाणे म्हणजे आपण केवळ अक्षराची साक्षरता असलेली माणंस निर्माण केली शिक्षणाची पेरणी झाली नाही त्याचा हा पुरावा म्हणायला हवा. पण असे जेव्हा घडते तेव्हा शिक्षणातून सुजाण नागरिक निर्माण करण्याचे आव्हान शिक्षण व्यवस्था पेलू शकली नाही हे वास्तव समोर आलेच. शिक्षणाने वाचायला शिकविले, पण विचार करायचे शिकविले नाही. विचार करायला शिकविले तरी जगण्यात मात्र तो विचार रूजविण्याचे राहून गेले का हा प्रश्न अनुत्तरित राहातो.

- Advertisement -

अलिकडे शहरा शहरातील चौका चौकात पोलीस उभे राहिलेले दिसले, की शहरात किती जागृकता आहे असे बोलले जाते. शहर किती शिस्तबध्द आहे असे कौतूक होते. कारण पोलीसांच्या धाकाने किमान वाहतूक शिस्तीत असते. पण खरच पोलीसांच्या उपस्थिती सुरू असणारे हे वर्तन जागृतीचे लक्षण मानायचे का..? मुळात पोलीस चौकाचौकात उभे राहाणे म्हणजे शहर किती अशिक्षित आहे याचे ते लक्षण आहे. चौकात सिग्नल व्यवस्था असतांना देखील शिकलेली माणंस सिग्नल तोडतात. ते तोडू नयेत आणि तोडल्यावर शिक्षा करण्यासाठी पोलीस आहेत. हे काही सुजान पणाचे, शिक्षित समाजाचे लक्षण नाही. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असे सुजाण पणाचे वागणे शिक्षणातून रूजले नाही. त्यामुळे समाजाचे प्रश्न कायम आहेत आणि त्यात दिवसेंदिवस भर पडते आहे. शिक्षण हे प्रश्न निराकरणाची व्यवस्था आहे असे म्हटले जाते, पण तेच शिक्षण मूळ हेतून दिले गेले नाही आणि रूजविण्याचा प्रयत्न झाला नाही तर ते वाया जाते. पाऊस पडण्यापूर्वी शेतकरी शेतीची मशागत करतो म्हणून शेतीत पाणी अधिक जिरते आणि त्यानंतर तेथे पिकांचे फुलणे होते. शिक्षणाचे देखील तसेच आहे. केवळ अक्षरे, माहिती, विचार मशागती शिवाय पेरत राहाल तर ती मस्तकात जिरण्याची शक्यता नाही. जे जिरत नाही ते रूजणार कसे? जिरण्यासाठी शेतात मशागत आवश्यक असते त्या प्रमाणे मानवी मनात विचार रूजविण्यासाठी शिक्षणातून विवेकशीलतेची मशागत करण्याची गरज आहे. शिक्षणातून मशागत झाली, तर मानवी जीवन अधिक समृध्द होईल. त्याप्रमाणे राष्ट्रही प्रगतीकडे चालू लागेल. त्यातून प्रामाणिकपणा आपोआप रूजेल. जेव्हा समाज भ्रष्ट आहे असे म्हटले जाते त्याचा अर्थ शिक्षणातून नैतिकतेचा विचार रूजला गेला नाही किंवा शिक्षणातील नैतिकतेपेक्षा समाजातील भ्रष्टाचाराचा प्रभाव अधिक पडला त्यामुळे भ्रष्टाचार संपविण्याठी कायदे करणे हा पर्याय नाही. तर तो मूळातून नष्ट करण्यासाठी मनाची जडण घडण महत्वाची असते. त्यासाठी सुजाण नागरिक निर्मितीची गरज आहे. ती केल्यांने समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटतील. जगभरातील विचारवंत, धोरणकर्ते उत्तम शिक्षणासाठी आग्रही भूमिका घेतांना पाहावयास मिळतात. शिक्षणाकडे जो समाज व राष्ट्र गंभीरपणे न पाहाता काम चलाऊ भूमिकेने शिक्षणाकडे पाहात राहाते आणि ते सुरू ठेवते, तेथे त्याचे फळही त्याच स्वरूपात मिळत राहाते. त्यामुळे शिक्षण सुरू राहून अपेक्षित फळ मात्र मिळत नाही आणि मग शिक्षण देखील परिणामकारक नाही असे वदले जाते.

शिक्षणातून सुजाण नागरिक निर्माण झाला तर तो नागरिक जे काम करतो त्या कामावर त्यांची निस्सिम श्रध्दा असते. त्या कामात अधिक उत्कृष्टता साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणे घडते. कोणतेही काम दर्जाहिन असत नाही आणि कोणतेही काम श्रेष्ठ असत नाही. मंत्रालयात खुर्चीवर बसलेला माणूंस जितक्या उंचीचा असतो तितकीच उंची गावात स्वच्छता करणा-या व्यक्तीची असते. कारण दोन्ही कामे राष्ट्राच्या प्रगतीची आणि उन्नतीची असतात. आपल्या कामासाठी सुजाण व्यक्ती सतत कष्टत राहाते. आपल्या कामात समाजाचे कल्याण असल्यांने ते अधिक समाधान देणारे कसे होईल यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करीत असते. आपले कामातून स्वतःचे समाधान आणि समाजाची प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न केला जात असतो. ऱस्त्यावर झाडणारी महिली अगदी मन लावून झाडत होती. तीला एकदा विचारले काय करते आहे..? तर ती म्हणाली “मी माझा देश स्वच्छ करीत आहे” छोटयाशा कामात देखील देश असतो ही भावना कामाला उंची आणि मनाला समाधान मिळून देत असते. सुजान नागरिकाच्या प्रत्येक कामात राष्ट्र व समाज हित जाणवते. त्यामुळे त्यांचा संपूर्ण जीवन आणि लोक व्यवहारात सामजिक जाणीवा आणि राष्ट्रप्रेम सामावलेले असते,जेव्हा शिकलेली माणंस प्रामाणिक काम करीत नाही त्याचा अर्थ केवळ साक्षरता आली आहे. शिक्षण झाले नाही.

एकदा एका गटाला रस्त्याच्या कडेला झाडे लावण्याचे काम देण्यात आले होते. खरेतर वृक्षलागवड हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, पण तरीसुध्दा केवळ नोकरी म्हणून आपले काम आहे हे जाणून तो गट काम करीत होता. साहेबांनी तीन जनांचा एक गट केला होता. एकाने खडडा खोदावा, दुस-यांने झाड लावावे आणि तिस-यांने खडडा बुजवावा असे जबाबदारीचे वितरण करण्यात आले होते. एक दिवस साहेब रस्त्याने जात असतांना एक जन खडडा खोदत होता आणि दुसरा बुजवत होता हे पाहून साहेबांना आश्चर्य वाटले. त्यांनी तात्काळ गाडी थांबवत त्यांना “झाड न लावता खडडा का बुजवत आहात” असे विचारले तर ते म्हणाले, “आमचे काम आम्ही करतो आहोत. आम्हाला जे नेमून दिले ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहोत”.खरेतर जबाबदारी पार पाडली जात होती. पण झाडे लावली जात नव्हती. त्याचे कारण विचारले तर ते म्हणाले “ज्याच्या वरती झाडे लावण्याची जबाबदारी होती तो रजेवर होता, म्हणून आम्हाला जे काम नेमून दिलेले आहे ते कोणताही कामचूकार पणा न करता करीत आहोत”. शिकलेली माणंस असूनही जर त्यांच्या कामात बेजबाबदार पणे कर्तव्याची जबाबदारी निभावणे असेल तर ते सुजाण कसे असा प्रश्न पडतो.

सुजाण पणात आपल्या सहकार्यांबददल सहदयतेत असतो. दुस-याच्या हितात आपले हित सामावलेले असते याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे प्रत्येक कामाच्या ठिकाणी सन्मान असतो.स्वतःला झोकून देणे घडते. कोणत्याही जबबादारी पासून पलायन नसते आणि त्या कामाचा भारही त्यांना वाटत नाही. त्यामुळे तक्रार करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. त्याच बरोबर समाजात वावरतांना जात, पात, धर्म, भाषा, परीस्थिती याचा विचार केला जात नाही. कारण सुजान नागरिकाच्या दृष्टीत समतेचा विचार अधोरेखित झालेला असतो. त्यांच्यासाठी माणूस हाच केंद्र्स्थानी असतो. शिक्षणातून माणूस घडवायचा असतो. तो घडला की त्याला अवतीभोवती सर्वत्र माणूस दिसतो. त्यांच्या दृष्टीत माणूस या पलिकडे काहीच नसते. त्याच्यासाठी माणूस हीच जात आणि धर्म असतो. असे जेव्हा घडते तेव्हा समाजात जातीपातीच्या भिंती आपोआप तुटून पडतात. समाजातील विषमता संपुष्टात येण्याचा मार्ग उभा राहातो. त्याच्यासाठी भ्रष्टाचार हे पाप ठरते. व्देष, मत्सर, राग, लोभ असे काही उरत नाही.

आज आपल्याला आपला देश, समाज आपला वाटतो का ? असा स्वतःच स्वतःला जरी प्रश्न विचारला तर उत्तर होय येते. पण त्या होय मध्ये दडलेला भावार्थ जीवन व्यवहारात प्रतिबिंबीत होत नाही. आपल्या देशात राहातांना आपल्या देशाचे नियम, कायदे पालन करण्याची जबाबदारी आपण निभावत नाही. आपला देश असतांना पान, तंबाखू खाऊन कोठेही थुंकणे घडते. सारे भारतीय माझे बांधव असतांना देखील माझ्या जातीचा, माझ्या पंथाचा, माझ्या धर्माचा माणूस मला प्रिय का वाटतो..? कारण शिक्षणाच्या पाठातून,आशयातून समतेचा विचार पाझरला नाही. गाभाघटक रूजले नाहीत. त्यामुळे शिक्षण घेऊनही समाजातील प्रश्न सुटू शकले नाहीत. विषमता नष्ट करण्याचा विचार असतांना ती नष्ट झाली नाही. शिकणे हे समस्येचे उत्तर असते, पण वर्तमानात शिक्षण हिच समस्या वाटू लागली आहे. अशिक्षित माणंस अधिक माणूसपण जोपासतांना दिसतात आणि त्याचवेळी शिक्षित माणंस हिंसक विचाराने पावले टाकत जातात. समाजात जेव्हा शिक्षकांच्या पेक्षा पोलीसाची गरज अधिक वाटत जाते, तेव्हा आपण उलटया दिशेचा प्रवास सुरू केला आहे असे समजावे. आज आपल्या अवतीभोवती काय दिसते आहे ते पाहून ठरवायला हवे आपण कोणत्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या