अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर तालुक्यात विविध गावात सहकारी सोसायट्यांनी थकबाकीदार शेतकर्यांकडून विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सुचना केल्या आहेत. कर्जमाफीच्या पूर्व तयारीचा हा भाग असल्याचे सांगण्यात आले. लवकरात लवकर थकबाकीदार शेतकर्यांनी त्यांच्याकडे असणार्या कर्जाच्या तपशीलासह अन्य कागदपत्रे सोसायटी पातळीवर जमा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. राज्य सरकारच्यावतीने जून 2026 पर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
दरम्यान, राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी देण्यासाठी सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यकरत असून या समितीने सहकारी बँकांमार्फत तालुका व गावपातळीवर असणार्या सहकार सोसायट्या मार्फत कर्जदार शेतकर्यांच्या विविध माहिती मागवली आहे. यात कर्जासाठी गहाण दिलेला सातबारा 7/12 झेरॉक्स प्रत, कर्जदार शेतकर्यांचे आधार कार्ड झेराक्स प्रत, फार्मर आयडी, पॅनकार्ड, सेव्हिंग पासबुक झेरॉक्स प्रत, कर्जखाते के.सी. सी. झेरॉक्स प्रत, मोबाईल क्रमांक लिंक असलेला, तसेच मुळ कर्जदार मयत असल्यास तर त्यांच्या वारसदार नेमुन स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र या कागदपत्रे संबंधीत गावातील सहकारी संस्थेच्या सचिवांकडे स्व प्रमाणीत जमा करावीत. यामुळे सोसायट्यांना कर्जदार शेतकर्यांची माहिती संकनल करता येणार आहे.
संबंधीत शेतकर्यांचे सेव्हिंग खाते किंवा कर्ज खात्याची केवायसी नसल्याने नव्याने खाते उघडण्यात यावे, शेतकर्यांना अडचण असल्यास त्यांनी त्यांच्या सोसायाटी सचिवांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नगर तालुक्यातील अनेक गावात अशा प्रकारे कर्जदार शेतकर्यांकडून माहिती संकलित करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा बँकेशी संपर्क साधला असता त्यांनी राज्य पातळीवरील कर्जमाफीसाठी कार्यरत समितीने याबाबतच्या सुचना दिल्याने कर्जदार शेतकर्यांची माहिती संकलित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
एडीसीसीची अवघी दीड टक्के वसुली
जिल्हा सहकारी बँकेची चालू आर्थिक वर्षात केवळ 1.20 टक्के वसुली झालेली आहे. बँकेच्यावतीने 2 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज वसुलीस पात्र असून सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेसह पिक कर्ज वसुलीस एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने जिल्हा बँकेच्या वसुलीचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे.




