नाशिक | Nashik
राज्यातील २९ महापालिकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिले आहे. राज्यात महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी मुख्य रस्सीखेच असतानाच, भाजप, शिवसेना शिंदे पक्ष आणि अजित पवार यांची असलेली महायुती काही महापालिकांमध्ये वेगळी झाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबई वगळता अनेक जिल्ह्यांत जागावाटपाच्या घोळामुळे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटप न झाल्यामुळे महायुती फिस्कटली आहे.
कोणकोणत्या महापालिकांमध्ये महायुती फिस्कटली?
नाशिकमध्ये महायुती फिस्कटली
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रयत्न होता. त्यानुसार वाटाघाटी देखील सुरु होत्या. मात्र शेवटचा दिवस येऊन देखील कुठलाही निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाने एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आणि वेळ कमी राहिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. मोठा भाऊ म्हणून आम्ही भाजपच्या निर्णयाची वाट बघत होतो. मात्र कुठलाही निरोप न आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि शिवसेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली – संजय शिरसाट
“भाजपच्या अहंकारामुळेच युती तोडतोय,” असा थेट आरोप करत शिरसाट यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यामुळे संभाजीनगरातील शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट झाला आहे. “एकीकडे युतीच्या चर्चा सुरू असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे शिवसेनेला कमी लेखणारे प्रस्ताव द्यायचे, ही दुहेरी भूमिका भाजपने घेतली,” असा आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की, या घडीला सुद्धा भाजपकडून कोणताही नवा किंवा सन्मानजनक प्रस्ताव देण्यात आलेला नाही. उलट भाजपने आपली आग्रही भूमिका कायम ठेवली. आमची ताकद वाढली. आम्ही काहीही करू शकतो, असा त्यांना अहंकार होता. त्याचा अंत आज भाजप-शिवसेना युती तोडल्याने झाला, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
पुण्यात कार्यकर्त्यांवर अन्याय
पुण्यातही शिवसेना भाजप युती तुटल्याची माहिती समोर आली. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याच्या आरोपाने लक्ष वेधले आहे. शिवसैनिकांची नाराजी समोर आली असून पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड मधील शिवसेना- भाजप युती संदर्भात उदय सामंत घेणार प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून, त्यानंतरच युती बाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे म्हटले जात आहे.
अमरावतीतही भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याचे कळत आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार असून, सोमवार (३० डिसेंबर २०२५)ला दिवसभर झालेल्या शिवसेना-भाजपच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. शिवसेनेने २५ जागांचा दिलेला प्रस्ताव भाजपाला अमान्य असून, भाजप शिवसेनेला १६ ते १७ जागा देण्यास तयार होती ज्यावर तोडगा निघू शकलेला नाही.
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत महायुती तुटली असून, इथं शिंदे गट आणि भाजप दोन्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असून स्वबळाचा नारा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप 95 जागांवर स्वतःचे उमेदवार उभे करणार असून, तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांनी खूप दक्षता घेतली आहे.
नवी मुंबईतही महायुती फिस्कटली असून, भाजपा आणि शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत, इथे जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे दोन्ही पक्ष सर्व १११ प्रभागातील इच्छुकांना देणार AB फॉर्म देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




