पुणे | Pune
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेसेनेला सोबत घेण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. मात्र, शिंदेसेनेला जागा देण्याबद्दलच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. शिंदेसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी ठिय्या दिला होता. त्यानंतर आता शिंदेसेनेच्या दोन नेत्यांमध्येच बैठक सुरू असताना राडा झाला.
पुण्यामध्ये शिंदे गटाची बैठक सुरू असताना मोठा वाद निर्माण झाला आणि एक नेता थेट बैठक सोडून निघून गेला. महायुतीमधील अंतर्गत नाराजी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो आता चव्हाट्यावर येत आहे. ऐन निवडणुकीच्यावेळी पुण्यात शिंदे गटात नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. शिंदेसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात निघून गेले. त्यामुळे शिंदेसेनेत जागांवरून खदखद असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.
शनिवारी शिंदेसेनेच्या नेत्यांची पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला विजय शिवतारे, नीलम गोऱ्हे, रविंद्र धंगेकर आणि शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यासह पक्षाचे शहरातील प्रमुख नेते होते. याच बैठकीत शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये वाद झाला.
पुण्यात शिंदेसेनेतील अंतर्गत अस्वस्थतेचा स्फोट पुन्हा एकदा उघड झाला आहे. शहरातील पक्षाच्या आढावा बैठकीत शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांना ऐन बैठकीत अश्रू अनावर झाले, तर काही वेळातच ते बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्याची घटना घडली. पुण्यातील या बैठकीत पक्षातील संघटनात्मक कामकाज, जबाबदाऱ्या आणि स्थानिक राजकारणावर चर्चा सुरू होती. पक्षाचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे आणि आमदार विजय शिवतारे यांच्यात वादावादी झाली. त्यात भानगिरे यांना शिवीगाळ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर काही नेत्यांकडून झालेल्या टीका, दुर्लक्ष आणि नाराजीमुळे नाना भानगिरे भावनिक झाल्याचे पहायला मिळाले.
बैठकीत मिळालेल्या वागणुकीनंतर नाना भानगिरे हे रागारागात हॉटेलमधून बाहेर पडले. त्यांची समजूत घालण्यासाठी नीलम गोऱ्हे यांची स्वीय सहाय्यक आले. मात्र, भानगिरे हे निघून गेले. यामुळे पुण्यात शिंदेसेनेतील अस्वस्थता वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. आधीच जागावाटप, पदे आणि निर्णयप्रक्रियेवरून नाराजीचे सूर उमटत असताना, आता थेट बैठकीत घडलेल्या या नाट्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर भानगिरे हे नॉटरीचेबल आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




