Tuesday, May 21, 2024
Homeमुख्य बातम्याLok Sabha Election 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील...

Lok Sabha Election 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील लढत जवळपास निश्चित!

बारामती । Baramati

आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) जेष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar) आणि त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या लढाईत अजित पवार यांच्या गटाने बाजी मारली. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शरद पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होता. याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) या बारामतीच्या खासदार आहेत. बारामती मतदारसंघातून त्या तीनदा लोकसभेवर निवडून आल्या आहेत.

- Advertisement -

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाने बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा प्रचार करण्यासाठी मोहीम सुरू केल्याची माहिती आहे. त्यांच्या फोटोसह वाहन परिसरात फिरताना दिसत आहेत. वाहनावर सुनेत्रा आणि अजित पवार या दोघांचा फोटो असलेले फ्लेक्स बॅनर लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंत एकदाही निवडणूक लढलेली नाही. मात्र, पर्यावरण आणि महिलांशी संबंधित उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. प्रसारमाध्यमांत झळकत असलेल्या बातम्यांनुसार, अजित पवार यांचे निकटवर्तीय वीरधवल जगदाळे यांनी काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली होती. याबाबत वीरधवल जगदाळे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पत्रे लिहिली होती. तसेच खुद्द अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चांना खतपाणी घातले आहे. बारामतीत शुक्रवारी अजित पवार यांनी कोणाचेही नाव न घेता आपल्या मतदारांना भावनिक आवाहन केले की, ‘पुढील सार्वत्रिक निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पण अनुभवी लोकांसोबत राहणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या.’ अजित पवार यांनी आपल्या भाषणात पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता आगामी निवडणुकीत पत्नी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत मात्र दिले आहेत.

मात्र, सुप्रिया सुळे यांचा अनुभव आणि त्यांनी केलेली कामे बघता सामना एकतर्फी होण्याची चर्चा मतदारांमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुळे यांनी मतदार संघात लक्ष केंद्रित करत भेटीगाठी सुरू केल्या. महिलांकडे अधिक लक्ष दिले. त्यासाठी त्यांनी हळदी-कुंकू समारंभ, अंगणवाडी सेविकांचा कार्यक्रम असे कार्यक्रम घेतले. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या घरी जाऊन चर्चा केली. इतक्या वर्षात पहिल्यांदाच त्या थोपटेंना घरी जाऊन भेटल्या. तसेच सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना बारामतीच्या निवडणुकीवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकशाही पद्धतीने लढायचं असेल तर त्यांनी माझ्यासारखा तगडा उमेदवार जरूर आणावा. मी सुद्धा चर्चेसाठी तयार आहे. ते म्हणतील त्या ठिकाणी आणि ते म्हणतील त्या वेळी मी त्यांच्या उमेदवारासोबत चर्चा करायला तयार आहे, असं आव्हानच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना दिलं आहे. सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार दिल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा काय म्हणाले ते मी काही ऐकलं नाही. पण जे काही कानावर येत आहेत, ती विधाने धक्कादायक आहेत. शरद पवार लढवय्ये आहेत. त्यांनी शून्यातून सर्वकाही निर्माण केलं आहे. हा देश लोकशाहीच्या मार्गाने चालला आहे. देशात लोकशाही आणि संविधान सर्वात मोठे आहे. पंतप्रधान जेव्हा निवडून आले तेव्हा ते पायऱ्यांवर पाया पडले. आमच्या सगळ्यांसाठी लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर संसद भवन आहे. देशाची सेवा करण्यासाठी आम्ही संसद भवनात येतो. लोकशाहीवर टीका हे दुर्दैवी. त्यांचं विधान मला बाळबोध वाटतं. हा संविधानाचा अपमान आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कोण आहेत सुनेत्रा पवार?

६० वर्षीय सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्या राज्यातील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे माजी मंत्री होते, तर त्यांचे भाचे राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील हे उस्मानाबादचे भाजपचे आमदार आहेत. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दोन मुलं आहेत. जय आणि पार्थ पवार. जय हा कौटुंबिक व्यवसाय चालवतो, तर पार्थ पवार हे राजकारणात आहे. पार्थ पवार यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून लढवली होती. पण त्यात त्यांना यश आले नव्हते. सुनेत्रा पवार या आजवर सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या पण समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत. २०१० मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या संस्थापक आहेत. भारतातील इको-व्हिलेजची संकल्पना विकसित करण्यात त्या मार्गदर्शक ठरल्या आहेत, असे अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे. देखील आहे. वेबसाइटनुसार, सुनेत्रा पवार २०११ पासून फ्रान्सच्या वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरमच्या थिंक टँक सदस्यही आहेत.

गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरोधात बंड केले आणि काका शरद पवार यांची बाजू सोडून एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झाले. भाजप-शिंदे सरकारमध्ये त्यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. अजित पवारांसह इतर अनेक आमदारांनीही आपली निष्ठा बदलली. या सर्व घडामोडींमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची आहे. म्हणूनच सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी सुनेत्रा पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या