मुंबई | Mumbai
देशात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून येत्या सोमवारी (दि. १३ मे) रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान (Voting) पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांमधील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या विविध ठिकाणी सभा होणार असून दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर काय टीका करतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात (Fourth Phase) देशातील १० राज्यांमधील ९६ मतदारसंघात मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील (Maharashtra)नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या ११ मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये (Candidates)अनेक मतदासंघांमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याने प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतांना दिसतील.
दरम्यान, चौथ्या टप्प्यातील राज्यामधील विविध मतदारसंघांचा (Constituencies) विचार केल्यास जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, बीडमधून माजी मंत्री पंकजा मुंडे, शिरुरमधून डॉ.अमोल कोल्हे, पुण्यातून रविंद्र धंगेकर, नंदुरबारतून डॉ. हीना गावित, रावेरमधून रक्षा खडसे, नगरमधून डॉ. सुजय विखे यांच्यासह अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याआधी राज्यात पहिल्या तीन टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये मतदारांचा मतदानास कमी प्रमाणात प्रतिसाद दिसून आला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकही चिंतेत आहेत. यामुळे निदान चौथ्या टप्प्यात तरी जास्त प्रमाणात मतदान होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.