अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शनिवारी (दि.1) सायंकाळी सहानंतर देशातील सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यावर देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत एक्झिट पोल जाहीर झाले. यात महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभेच्या जागेचा समावेश असून विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर निवडणुकीतील राजकीय पक्षांसोबत नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, उद्या 4 जूनला मतमोजणी होणार्या नगर जिल्ह्यातील दोनही जागांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष राहणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असून त्याठिकाणी चौथ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी मतदान झाले होते. मतदान झाल्यानंतर निवडणुकीतील सर्वच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून विजयांचे अंदाज बांधण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिणेतील लोकसभेची निवडणूक चांगलीच चुरशी झालेली असून महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या राजकीय सभा, रॅली झाल्या होत्या. तर विरोधी महाविकास आघाडीसाठी ज्येष्ठनेते खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आ. बाळासाहेब थोरात, खा. सुप्रिया सुळे, आ. आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठा पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. यासह वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे निवडणुकीतील चुरस वाढली होती.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात विद्यामान खा. सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात माजी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सरळ लढत होईल, असे वाटत असताना ऐनवेळी वंचितकडून उत्कर्षा रुपवते यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत वाढवली होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघात 63.3 टक्के मतदान झाले असून मतदार राजाचा कौल कोणाला मिळणार हे उद्या (दि.4) जूनला दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. शिर्डीत आजी-माजी खासदारांमध्ये लढत असून वंचित रुपवते यांची उमेदवारी कोणाला भोवणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
नगर लोकसभा मतदरसंघात भाजपचे विद्यमान खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात ऐनवेळी निवडणूक रिंगणात उतरलेले माजी आ. नीलेश लंके यांनी कडवे आव्हान दिले. मात्र, हे आव्हान मतदानाच्या स्वरूपात लंके यांच्या पारड्यात पडणार? यासाठी मतमोजणीच्या 25 पेक्षा अधिक फेर्या होईपर्यंत वाट पाहवी लागणार आहे. नगर लोकसभेसाठी 66.61 टक्के मतदान झालेले असून मागील पंचवार्षिकच्या तुलनेत ते दोन टक्क्यांच्या जवळपास वाढलेले आहे. याठिकाणी ग्रामीण भागासह नगर शहरात कोण आघाडीवर राहणार याबाबत अंदाज बांधण्यात येत असून अनेक ठिकाणी पैजा लावण्यात आलेल्या आहेत. या मतदारसंघात निवडणुकीतील दोन्ही उमेदवारांच्या समर्थंकाकडून विजयाचे दावे करण्यात येत आहे. दरम्यान, एक्झिट पोलनंतर नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगरच्या जागेवरून निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
मतमोजणीची तयारी पूर्ण
उद्या (दि.4) सकाळी आठ वाजल्यापासून नगर एमआयडीच्या वखार महामंडळाच्या गोडावूनमधून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. याठिकाणी प्रशासकीय पातळीवर जवळपास सर्व तयारी पूर्ण करण्यात आले असून मतमोजणीच्या प्रक्रियेत जवळपास दीड हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. मतमोजणीच्या वेळी पोलीसांसह सीआरपीएफच्या जवानासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल लावण्यात आलेले आहेत.
मुख्य निवडणूक अधिकार्यांकडून पाहणी
अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी रविवारी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक रविकुमार अरोरा, अजय कुमार बिस्त, अरुल कुमार, तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र वखार महामंडळ येथे नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी होणार्या गोदाम क्रमांक 1 व गोदाम क्रमांक 3 येथील व्यवस्थेची पाहणी करून मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने उपस्थित अधिकार्यांना त्यांनी सूचनाही केल्या.