Friday, November 22, 2024
Homeनगर4 हजार 357 पोस्टल मतदारांचे मतदान

4 हजार 357 पोस्टल मतदारांचे मतदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

निवडणुकीच्या कामात सहभागी होत जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात कर्तव्य बजावणार्‍या, नेमणुकीस असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांसह अन्य शासकीय विभागातील अधिकारी- कर्मचारी, तसेच सैनिक मतदार असणार्‍या (ईटीपीबीएस प्रणाली व्दारे मतदान करणार्‍या) 4 हजार 357 मतदारांनी पोस्टल मतदान प्रक्रियेत सभाग नोंदवला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील पोस्टल मतदानाची ही आकडेवारी आहे.

- Advertisement -

दरम्यान, सैनिक मतदार असणार्‍या ईटीपीबीएस प्रणालीव्दारे मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार असून यासाठी त्यांना मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 4 जूनला सकाळी 7 वाजून 59 मिनीटापर्यंत मतदान करून त्यांची मते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापर्यंत विहित मार्गाने पाठवता येणार आहेत. 4 जूनला सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून त्या आधी एक मिनीटापर्यंत सैनिकांना प्रणालीव्दारे मतदान करता येणार आहे. ते मोजणीच्या आधी स्वीकारले जाणार असल्याची माहिती नगर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावतीने देण्यात आली.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील पोस्टल मतदानाची ही आकडेवारी असून यात 85 वर्षाचे ज्येष्ठ किंवा 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असणार्‍या 748 मतदारांपैकी 694 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. यासह सैनिक म्हणून कार्यरत असणार्‍या 7 हजार 68 मतदारांपैकी 687 मतदारांनी प्रणालीव्दारे मतदान केलेले असून ही प्रक्रिया 4 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. यासह नगर लोकसभा मतदारसंघात असलेले मात्र 13 मे रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदारांपैकी 1 हजार 178 मतदारांचे मत नगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. तसेच नगर लोकसभा मतदारसंघातर्गंत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर असणार्‍या मतदार सुविधा केंद्रांत 892 मतदारांनी टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान केलेले आहे. यासह अन्य मतदारसंघात कर्तव्यावर असणारे 906 असे एकूण 4 हजार 357 पोस्टल मतदारांचे मत निवडणूक यंत्रणेला मिळालेले आहे.

मुळचे नगर लोकसभा मतदारसंघात असणारे मात्र, 13 मे रोजी जिल्ह्यातील शिर्डी यासह नांदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, शिर्डी, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यातील मतदारसंघात नगरचे शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस हे कर्तव्यावर असल्याने त्यांना पोस्टल प्रक्रियेव्दारे मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे. यासह अन्य जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील अधिकारी- कर्मचारी हे नगर लोकसभा मतदारसंघात मतदानाच्यावेळी कर्तव्यावर होते. त्यांचे मतदान टपाली मतदान प्रक्रियेव्दारे त्यात्या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेच्यावतीने देण्यात आली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या