अकोले |प्रतिनिधी| Akole
सध्या भाजपमध्ये (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मंत्री मधुकरराव पिचड (Madhukar Pichad) व त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबई येथे सिल्व्हर ओक या बंगल्यावर भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते. या भेटीचे वृत्त तालुक्यात समजताच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पिचड पिता-पुत्र पुन्हा घर वापसी करत हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चांना आता जोरदार उधाण आले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) आधी पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे तालुक्यातील पिचड विरोधकांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकत्रित केले व वैभव पिचड यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी डॉ. किरण लहामटे यांना देत एकास एक लढत करण्यात शरद पवार यशस्वी ठरले होते. त्यावेळी वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांना मोठ्या मताधिक्याने पराभवाला सामोरे जावे लागले. पिचड यांचा पवारांना सोडत भाजप पक्ष प्रवेश हा जनतेला मान्य झाला नव्हता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) त्यांना त्याची किंमत मोजावी लागली होती.
तेंव्हापासून पिचड पिता-पुत्र हे भाजपमध्येच राहिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या (BJP) वरीष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध राहिले. भाजप पक्षाकडून आपल्याला विधानसभा उमेदवारी मिळेल असा आशावाद व्यक्त करत वैभव पिचड यांनी आपण आ. डॉ. किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamate) यांचे काम कोणत्याही परिस्थीतीत करणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. जर भाजप पक्षाने आपणास उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्ते व जनभावना लक्षात घेत आपण आपला पुढील निर्णय घ्यायला मोकळे असल्याचे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखविले आहे.
अकोले विधानसभेची (Akole Legislative Assembly) जागा महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) म्हणजेच विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांनाच मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे सध्या भाजपमध्ये असणार्या ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड व वैभव पिचड यांच्या पुढे पुन्हा स्वगृही परतण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय सध्या तरी उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. पिचड समर्थकांच्या म्हणण्यानुसार सत्तेत असतानाही भाजप पक्षाकडून कोणत्याही प्रकारे विकास कामासाठी मदत झाली नाही. किंबहुना पालकमंत्री म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांचे कडूनही विकास कामांसाठी भरीव असा निधी उपलब्ध होऊ शकला नाही याबद्दल भाजप कार्यकर्ते व पिचड समर्थक उघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्याउलट अकोले तालुक्याचा चेहरा मोहरा बदलविण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा राहिला आहे.
पवार यांना मानणारा मोठा चाहता वर्ग मतदार संघात असल्यामुळे पिचड पिता पुत्रांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करावा असा अनेक दिवसांपासूनचा पिचड समर्थक व भाजप मधील काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पवार व पिचड यांचे पूर्वीचे संबंध लक्षात घेता अकोले विधानसभा मतदार संघातून (Akole Legislative Assembly) महाविकास आघाडीची उमेदवारी वैभव पिचड यांना मिळेल असा आशावाद त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या भेटी बाबत पिचड पिता-पुत्र यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याबद्दल मतदार संघासह जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.