Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Assembly Election 2024 : जिल्ह्यात ६७.९७ टक्के मतदान; कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक...

Nashik Assembly Election 2024 : जिल्ह्यात ६७.९७ टक्के मतदान; कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक व कमी मतदान

जाणून घ्या विधानसभानिहाय आकडेवारी

नाशिक | Nashik

गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) मतदानाची (Voting) प्रक्रिया बुधवार (दि.२० नोव्हेंबर) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता सुरळीत पार पडली. यावेळी मतदानास शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. तर काही मतदान केंद्रांवर मतदानाची मुदत संपल्यानंतरही रांगा लागल्याचे दिसून आले. यामध्ये नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ६७.९७ टक्के मतदान झाले. त्यानंतर आता शनिवार (२३ नोव्हेंबर) रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ७०.७० टक्के मतदान झाले असून एकूण ३ लाख ४३ हजार ०५६ मतदारांपैकी २ लाख ४२ हजार ५२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख २८ हजार १६२ पुरुष तर १ लाख १४ हजार ३५९ महिला आणि इतर ४ जणांचा समावेश आहे.या मतदारसंघात महायुतीचे सुहास कांदे, महाविकास आघाडीचे गणेश धात्रक आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ व डॉ.रोहन बोरसे यांच्यात कडवी झुंज होण्याची शक्यता आहे. तर मालेगाव मध्य मतदारसंघात एकूण ६९.६९ टक्के मतदान झाले असून एकूण ३ लाख ४२ हजार ७१३ मतदारांपैकी २ लाख ३८ हजार ८२७ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख २५ हजार ८७८ पुरुष तर १ लाख १२ हजार ९४५ महिला आणि इतर १ जणाचा समावेश आहे. या मतदारसंघात एमआयएमचे मौलाना मुफ्ती इस्माईल, काँग्रेसचे एजाज बेग समाजवादी पक्षाचे शान ए हिंद निहाल अहमद आणि माजी आमदार आसिफ शेख यांच्यात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात एकूण ६७.५४ टक्के मतदान झाले असून एकूण ३ लाख ८० हजार ५७६ मतदारांपैकी २ लाख ५७ हजार ०५७ मतदारांनी मतदान केले.यात १ लाख ३४ हजार १८१ पुरुष तर १ लाख २२ हजार ८७६ महिलांचा समावेश आहे.या मतदारसंघात पालकमंत्री व महायुतीचे उमेदवार दादा भुसे, शिवसेना (उबाठा)चे अद्वय हिरे आणि अपक्ष उमेदवार प्रमोद (बंडू) काका बच्छाव यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तसेच बागलाण मतदारसंघात एकूण ६५.१९ टक्के मतदान झाले असून एकूण २ लाख ९९ हजार ११८ मतदारांपैकी १ लाख ९४ हजार ९९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९९ हजार ८९६ पुरुष तर ९५ हजार १०१ महिलांचा समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीचे (भाजप) दिलीप बोरसे आणि महाविकास आघाडीच्या (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष) दीपिका चव्हाण यांच्यात दुरंगी लढत होत असून त्यांना अपक्षांचे कडवे आव्हान असणार आहे.

कळवण विधानसभा मतदारसंघात एकूण ७५.०७ टक्के मतदान झाले असून एकूण ३ लाख १९ हजार ९९६ मतदारांपैकी २ लाख २६ हजार ६९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख १६ हजार ३७७ पुरुष व १ लाख १० हजार ३२१ महिलांनी मतदान केले. या मतदारसंघात महायुतीचे (राष्ट्रवादी अजित पवार) नितीन पवार आणि महाविकास आघाडीचे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) जे.पी.गावित यांच्यात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर चांदवड विधानसभा मतदारसंघात एकूण ७६.८१ टक्के मतदान झाले असून एकूण ३ लाख ८८ हजार ८०८ मतदारांपैकी २ लाख ३७ हजार १८३ मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात महायुतीचे (भाजप) डॉ.राहुल आहेर, महाविकास आघाडीचे शिरीष कोतवाल आणि अपक्ष उमेदवार केदा आहेर यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

येवला विधानसभा मतदारसंघात एकूण ७६.३० टक्के मतदान झाले असून एकूण ०३ लाख २६ हजार ६२३ मतदारांपैकी ०२ लाख ४९ हजार २०० मतदारांनी मतदान केले. यात एक लाख ३२ हजार ४१९ पुरुष तर एक लाख १६ हजार ७८१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात महायुतीचे (राष्ट्रवादी अजित पवार) छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी शरद पवार) माणिकराव शिंदे यांच्यात दुहेरी सामना होणार आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघात एकूण ७३.८५ टक्के मतदान झाले असून एकूण तीन लाख २३ हजार ४६४ मतदारांपैकी दोन लाख ३८ हजार ८७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात एक लाख २७ हजार ३७० पुरुष तर एक लाख ११ हजार ५०८ महिलांनी मतदान केले. या मतदारसंघात महायुतीचे (अजित पवार गट) माणिकराव कोकाटे आणि महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उदय सांगळे यांच्यात लढत होणार आहे.

निफाड विधानसभा मतदारसंघात एकूण ७३.१४ टक्के मतदान झाले असून एकूण दोन लाख ९८ हजार मतदारांपैकी दोन लाख १८ हजार ५८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एक लाख १४ हजार पुरुष तर एक लाख ०४ हजार ५८० महिलांनी मतदान केले.या मतदारसंघात महायुतीचे (अजित पवार गट) दिलीप बनकर आणि महाविकास आघाडीचे (शिवसेना उबाठा) अनिल कदम व प्रहार जनशक्ती पक्षाचे गुरुदेव कांदे यांच्यात सामना होणार आहे.दिंडोरी विधानसभा मतदारसंघात एकूण ७८.०१ टक्के मतदान झाले असून एकूण तीन लाख २९ हजार १३६ मतदारांपैकी दोन लाख ५६ हजार ७६० मतदारांनी मतदान केले. यात एक लाख ३४ हजार ८०० पुरुष तर एक लाख २१ हजार ९५९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.या मतदारसंघात महायुतीचे (अजित पवार गट) नरहरी झिरवाळ आणि महाविकास आघाडीच्या (शरद पवार गट) सुनिता चारोस्कर यांच्यात दुहेरी सामना होणार आहे.

नाशिक पूर्व मतदारसंघात एकूण ५७.६३ टक्के मतदान झाले असून एकूण चार लाख ०९ हजार २३९ मतदारांपैकी दोन लाख ३५ हजार ८५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यात एक लाख २२ हजार ५८ पुरुष तर एक लाख १३ हजार ७९० महिलांचा समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीचे (भाजप) राहुल ढिकले आणि महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) गणेश गीते यांच्यात दुहेरी लढत होत आहे. नाशिक मध्य मतदारसंघात एकूण ५६.३४ टक्के मतदान झाले असून एकूण तीन लाख ४५ हजार ३९३ मतदारांपैकी एक लाख ९४ हजार ५८५ मतदारांनी मतदान केले. यात एक लाख ८०७ पुरुष तर ९३ हजार ७५९ महिलांचा समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीच्या (भाजप) देवयानी फरांदे महाविकास आघाडीचे (शिवसेना उबाठा) वसंत गीते व वंचित बहुजन आघाडीचे मुशीर सय्यद यांच्यात तिहेरी होण्याची शक्यता आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघात एकूण ५६.०८ टक्के मतदान झाले असून एकूण चार लाख ८३ हजार ४९५ मतदारांपैकी दोन लाख ७१ हजार १३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एक लाख ४५ हजार ८६२ पुरुष तर एक लाख २५ हजार २७० महिलांनी मतदान केले. या मतदारसंघात महायुतीच्या (भाजप) सीमा हिरे, महाविकास आघाडीचे (शिवसेना उबाठा) सुधाकर बडगुजर आणि मनसेचे दिनकर पाटील यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.देवळाली विधानसभा मतदारसंघात एकूण ६३.४५ टक्के मतदान झाले असून एकूण दोन लाख ८८ हजार १४१ मतदारांपैकी एक लाख ८२ हजार ६७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९६ हजार १७२ पुरुष तर ८६ हजार ४९८ महिलांचा समावेश आहे.या मतदारसंघात महायुतीच्या (राष्ट्रवादी अजित पवार गट) सरोज अहिरे, महाविकास आघाडीचे (शिवसेना उबाठा) योगेश घोलप आणि शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

इगतपुरी विधानसभा मतदारसंघात एकूण ७२.२१ टक्के मतदान झाले असून एकूण दोन लाख ८० हजार ५५९ मतदारांपैकी दोन लाख ०२ हजार ६०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात एक लाख ०५ हजार ४७० पुरुष तर ९७ हजार १२८ महिलांचा समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीचे (राष्ट्रवादी अजित पवार गट) हिरामण खोसकर, महाविकास आघाडीचे (काँग्रेस) लकी जाधव, मनसेचे काशिनाथ मेंगाळ आणि अपक्ष उमेदवार निर्मला गावित यांच्यात ‘काटे की टक्कर’ होण्याची शक्यता आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील एकूण ५० लाख ६१ हजार १८५ मतदानापैकी ३४ लाख ४० हजार २४० मतदान झाले. यामध्ये १८ लाख ०२ हजार ३६२ पुरुष तर १६ लाख ३७ हजार ८४४ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या