मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Assembly Elections) बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी मतदान पार पडले. या निवडणुकींचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था व खासगी संस्थांनी निवडणूक निकालांचे अंदाज (Exit Poll) जाहीर केले आहेत. प्रमुख १० संस्थांचे अंदाज (निवडणूक निकालाचे एक्झिट पोल) पाहिले तर त्यापैकी सहा अंदाज हे महायुतीच्या बाजूने आहेत, तर चार संस्थांच्या मते राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकते. मात्र हे एक्झिट पोल किती बरोबर ठरणार याबद्दल लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीचे किती एक्झिट पोल बरोबर ठरले होते हे जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात (Maharashtra) २०१९ च्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी ही राज्यातील सर्वात मोठी पार्टी (पक्ष) म्हणून समोर आली होती. भाजपाने (BJP) १०५ जागांवर विजय मिळवला होता, तर शिवसेनेने (संयुक्त) ५६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (संयुक्त) पक्षाला ५४ जागा मिळाल्या होत्या. तसेच काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला होता. मात्र, या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी सादर केलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपा-शिवसेना युतीला २०३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ८० ते ९० जागा मिळतील असे म्हटले होते. परंतु, भाजपा-शिवसेना युतीला केवळ १६१ जागा जिंकता आल्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला ९८ जागा मिळाल्या.
२०१९ च्या एक्झिट पोलच्या अंदाजात न्यूज १८- आयपीएसओएसचा एक्झिट पोल सर्वात हास्यास्पद ठरला होता. त्यांनी अंदाज वर्तवला होता की, एनडीएला २४३ व आघाडीला केवळ ४१ जागा मिळतील; तर इंडिया-टुडे अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल हा अचूकतेच्या जवळ जाणारा होता. इंडिया-टुडे अॅक्सिस माय इंडियाने म्हटलं होतं की, एनडीएला १६६ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ९० पेक्षा जास्त जागा मिळतील. रिपब्लिक-जन की बात या संस्थेने सर्वेक्षणानंतर २१६ ते २३० जागांवर एनडीएचे उमेदवार विजयी होतील आणि ५२ ते ५९ जागांवर यूपीएच्या उमेदवारांना विजय मिळेल असा अंदाज वर्तवला होता. तर टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये २३० जागा या एनडीएला मिळतील आणि ४८ जागा या यूपीएला मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. एबीपी न्यूज-सी व्होटरने २०४ जागा या एनडीएला आणि ६९ जागा यूपीएला मिळतील असे म्हटले होते. मात्र हे दोन्हीही अंदाज चुकचे ठरले होते.
हे देखील वाचा : Nashik Assembly Election 2024 : जिल्ह्यात ६७.९७ टक्के मतदान; कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक व कमी मतदान
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाबाबत यंदा जाहीर केलेल्या १० पैकी सहा एक्झिट पोल्सनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे.तर तीन एक्झिट पोल महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत.तसेच एक एक्झिट पोल राज्यात त्रिशंकू स्थिती असेल असे म्हणत आहे. यात इलेक्ट्रोल एज एक्झिट पोलनुसार महायुतीला ११८ व महाविकास आघाडीला १५० जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर पोल डायरी एक्झिट पोलच्या मते राज्यात महायुती १२२ ते १८६ आणि महाविकास आघाडी ६९ ते १२१ जागा जिंकेल असे म्हटले आहे.
याशिवाय चाणक्य एक्झिट पोलनुसार राज्यात महायुती १५२ ते १६० जागा आणि महाविकास आघाडी १३० ते १३८ जागा जिंकू शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर मॅट्रिझचा एक्झिट पोलनुसार महायुती १५० ते १७० जागा आणि महाविकास आघाडी ११० ते १३० जागांवर विजय मिळविल असा अंदाज बांधण्यात आला आहे. तसेच पी मार्क्यू एक्झिट पोलनुसार महायुती १३७ ते १५७ जागा व महाविकास आघाडी १२६ ते १४६ जागा जिंकेल असे सांगण्यात आले आहे. रिपब्लिक एक्झिट पोलनुसार महायुती- १३७ ते १५७ जागा आणि महाविकास आघाडी १२६ ते १४६ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर SAS एक्झिट पोलच्या मते महायुती १२७ ते १३५ जागा आणि महाविकास आघाडी १४७ ते १५५ जागा जिंकण्याची शक्यता आहे.
तसेच पिपल्स पल्स एक्झिट पोलनुसार महायुती १७५ ते १९५ जागा आणि महाविकास आघाडी ८५ ते ११२ जागांवर विजय मिळवू शकते. तर भास्कर रिपोर्टर्स पोलच्या मते राज्यात महायुती १२५ ते १४० जागा व महाविकास आघाडी १३५ ते १५० जागांवर विजय मिळविण्याची शक्यता आहे. तर लोकशाही महारुद्रच्या पोलनुसार महायुती १२८ ते १४२ जागा आणि महाविकास आघाडी १२५ ते १४० जागांवर जिंकण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा