इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri
यावर्षी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली असून मागील पंचवार्षिकला 67 टक्के मतदान झाले होते. मात्र यावर्षी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 69.39 टक्के मतदान झाले. तर इगतपुरी शहरातील आंबेडकरनगर येथील मतदान केंद्रावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कमीत कमी एक हजार मतदार मतदान करण्यासाठी केंद्रावर हजर झाल्याने एकच गोंधळ उडाला होता.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात 17 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यावर मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर इगतपुरी तालुक्यातील शेणवड बु. येथील एका मतदान केंद्रावर 25 मतदान झाल्यानंतर मशीन स्लो झाल्याची तक्रार मतदारांनी केल्यावर सदर मशीनची बॅटरी बदलल्यावर पुन्हा मतदान सुरळीत झाले. तर इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव येथे उमेदवारला मतदान केले तर दुसर्याच उमेदवाराला मत मिळत असल्याची अफवा पसरली होती. मात्र या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अभिजित बारवकर यांनी स्वतः पथकासह येऊन पडताळणी केली असता असा कुठलाही प्रकार घडलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेच्या तुलनेत विधानसभेसाठी मतदारांची संख्या वाढली आहे. ही सकारात्मक बाब असली तरी मतदार संख्या वाढल्याच्या प्रमाणात मतदानाची टक्केवारीसुद्धा वाढली आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात 300 मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांतून 2 लाख 80 हजार 559 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणार्या युवक मतदारांची संख्या लक्षणीय आहे.
या मतदारसंघात काशिनाथ मेंगाळ, हिरामण खोसकर, धनाजी टोपले, पक्ष बसपा, लकीभाऊ जाधव, अनिल गभाले, अशोक गुंबाडे, कांतीलाल जाधव, चंचल बेंडकुळे, भाऊराव डगळे, शरद तळपाडे, कैलास भांगरे, निर्मला गावित, जयप्रकाश झोले, बेबीताई तेलम, भगवान मधे, विकास शेंगाळ, शंकर जाधव या सर्वांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहेत. तर काही अपक्षांनी इतर उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
त्र्यंबकेश्वरला मतदानासाठी महिलांमध्ये उत्साह
त्र्यंबकेश्वरला विविध मतदान केंद्रांवर दुपारी तीन वाजेपर्यंत पुरुष मतदान करण्यासाठी गर्दी करून होते. मात्र त्यानंतर महिला मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. सर्व केंद्रांवर महिलांची गर्दी दिसून येत होती. 3439 पुरुष तर 3600 महिला असे 6939 मतदान झाले होते. निवडणुकीत मतदान करण्यासाठी महिलावर्ग उत्सुक असल्याचे वरील आकडेवारीवरून दिसून आले. घरकाम करूनदेखील पुरुषांपेक्षा महिला मतदानाबाबत जागरुक दिसल्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा