मुंबई | Mumbai
भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलतांना ‘नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला ६ हजार रुपये पेरणीला दिले. तुझ्या मायच्या, बहिणीच्या, बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, पायातले बूट-चप्पलसुद्धा आमच्यामुळे आहेत. तुझ्या हातातलं मोबाइलचं डबडं आमच्यामुळं आहे”, असे विधान केले होते. त्यावरून आज विधानसभेत गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.
काँग्रेसचे (Congress) आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी आज विधानसभेत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर माफी मागावी असे म्हटले. यावेळी पटोले हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या खुर्चीपर्यंत जाऊन तेथे असलेल्या राजदंडाला स्पर्श केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांची माफी मागावी, अशी मागणी केली.
यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी नाना पटोले यांचे एक दिवसासाठी निलंबन केले. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक होत सभात्याग केला. त्यानंतर पटोले माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, ‘राज्यातील सरकार शेतकरी विरोधी आहे. आमदार बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करावी. तसेच सभागृहात आम्ही रोज शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू, त्यावरून आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल, असेही पटोले यांनी म्हटले.




