मुंबई । Mumbai
राज्यात विधानसभेच्या मतदानाला काही दिवस उरले आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवत राजकीय प्रचाराला रंग चढला असून आता प्रचाराला अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. असे असताना महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आजच्या विदर्भातील सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत. ते थेट नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. आज अमित शहा यांची विदर्भात सभा होत्या. मात्र ते दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अमित शहा यांचा १५ व १७ नोव्हेंबरला विदर्भ दौरा आयोजित करण्यात आला होता. १५ नोव्हेंबरला विदर्भात त्यांची यवतमाळ मातदार संघात उमरेखड येथे व चंद्रपूर जाहीर सभा होती. आज (रविवार) त्यांची गडचिरोलीसह वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काटोल व सावनेर येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
तसेच अमित शहा यांचे शनिवारी रात्री नागपुरात आगमन झाले. त्यांचा खाजगी हॉटेलमध्ये मुक्काम होता. त्या ठिकाणी रात्री त्यांनी विदर्भातील काही भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. रविवारी सकाळी काटोल मतदार संघात चरणसिंह ठाकूर यांच्या प्रचारासाठी व त्यानंतर सावनेर मतदार संघात आशिष देशमुख यांच्या प्रचारासाठी सभा घेणार होते. त्यासाठी सकाळी १०.३० वाजता निघणार होते. त्यानंतर ग़डचिरोली आणि वर्धा येथे जाहीर सभा घेणार होते मात्र आज सकाळी शहा यांच्या विदर्भातील चारही सभा झाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
काही अपरिहार्य कारणाने त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याऐवजी भाजपचे अन्य नेते सभा घेतील, अशी माहिती आहे. परंतू अमित शाह अचानक दिल्लीला का गेले?, त्याचे कारण समजू शकलेले नाही. अमित शाह यांच्या नियोजित असलेल्या चारही सभांना आज स्मृती इराणी संबोधित करतील, असेही सांगण्यात येत आहे.