मुंबई | Mumbai
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी (BJP State President) कुणाची वर्णी लागणार याकडे लागून होते. त्यासाठी केंद्रीय भाजपने (BJP) केंद्रीयमंत्री किरण रिजिजू (Kiran Rijiju) यांची निरीक्षक म्हणून शुक्रवारी नियुक्ती केली. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी किरण रिजिजू हे ३० जून रोजी मुंबईत येतील आणि १ जुलै रोजी नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा करतील.
भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा निवडणुकीत (Loksabha Eletion) महाराष्ट्रात भाजपला मोठे अपयश आले होते. तर, विधानसभेला दणदणीत विजय मिळाला होता. त्यानंतर माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची जानेवारी २०२५ मध्ये प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नांदेड येथे २६ मे रोजी झालेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना ‘भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावली जाईल, असे बोलले जात होते. त्यानंतर आता प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी माजी मंत्री आणि सध्याचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची निवड १ जुलै रोजी मुंबईत केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या पद्धतीनुसार प्रदेशाध्यक्ष या पदासाठी अर्ज मागविले जातील. यावेळी चव्हाण यांचा एकट्याचा अर्ज येण्याची शक्यता आहे. यानंतर त्यांच्या नावाची घोषणा मुंबईत १ जुलै रोजी होईल. त्यानंतर एक महिन्यात पक्षाचे अधिवेशन होईल आणि चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. हे अधिवेशन ठाण्यात (Thane) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असतांना त्यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. तेव्हापासूनच ते भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होतील, असा अंदाज बांधला जात होता. मुख्यमंत्री फडणवीस (CM Fadnavis) यांचे निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे. तसेच फडणवीस यांच्या पूर्वीच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. त्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे .




