मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (दि.१० मार्च) रोजी राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प (Budget) विधानसभेत (Vidhansabha) सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर याठिकाणी होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याबाबत मोठी घोषणा केली. तसेच उत्तर महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग, शिर्डी विमानतळ आणि नार-पार प्रकल्पाबाबत देखील माहिती दिली.
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की,” नाशिक येथे सन २०२६ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नमामि गोदा अभियानाचा आराखडा तयार करून कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच नाशिक येथे रामकाल पथविकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदाकाठ परिसरातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी १४६ कोटी (Fund) १० लाख रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत”, असेही त्यांनी सांगितले.
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी तरतूद
अजित पवारांनी अर्थसंकल्पात नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या तरतूदीबाबत देखील माहिती दिली. ते म्हणाले की,” नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ७ हजार ५०० कोटी रूपये आहे. दमणगंगा-गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे ३.५५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील ९ हजार ७६६ हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. नाशिक जिल्ह्यातील २ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रालाही यामुळे सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत २ हजार ३०० कोटी रूपये आहे”, असे अजित पवारांनी सांगितले.
शिर्डी विमानतळासाठी १ हजार ३६७ कोटी रुपये
अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, “शिर्डी विमानतळाच्या विस्तार आणि विकासासाठी १ हजार ३६७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, त्या कामांना वेगाने सुरुवात झाली आहे.सन २०२१ मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर आता विमानतळाच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा करत लवकरच ‘नाईट लँडिंग’ सुविधाही सुरू केली जाणार आहे”, असेही त्यांनी म्हटले.
समृध्दी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे हा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी होणार खुला
अजित पवार म्हणाले की,”हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून त्यासाठी ६४ हजार ७५५ कोटी रुपये खर्च झाला आहे. इगतपुरी ते आमणे हा ७६ किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या महामार्गालगत अॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरविण्यात येतील. याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल, असे त्यांनी म्हटले.