मुंबई | Mumbai
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत सध्या १५०० रुपये मिळत असून तो हफ्ता २१०० रुपये केला जाणार का? याची सर्व लाभार्थी महिलांना उत्सुकता होती. दरम्यान अजित पवार यांनी योजनेकरीता एकूण ३६००० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे अशी माहिती दिली आहे.
अजित पवारांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला कवितांची पेरणी केली. अजितदादांनी म्हटले की, जनतेने महायुतीला अभूतपूर्व कौल दिला. मतदारांनी विश्वास हा जबाबदारीची जाणीव करून देणारा असून आम्हाला, सरकारला याची जाणीव आहे. केंद्र सरकारने आयकरात सूट देऊन मध्यमवर्गाला दिलासा दिला, रेल्वे-पायाभूत सुविधांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींचा उल्लेख
अजित पवार यांनी कवितांच्या ओळी सादर करत लाडक्या बहिणींचा उल्लेख केला. लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, कोटी प्रियजनांना मान्य झालो, विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो असे अजित पवार यांनी म्हणतात सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी जोरदार बाके वाजवून प्रतिसाद दिला.
काय म्हणाले अजित पवार?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै, २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झाला आहे. सन २०२५-२६ मध्ये या योजनेकरीता एकूण ३६००० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
यानंतर विधानसभेत अजित पवारांना २१०० रुपये देणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले की, अर्थसंकल्प होऊ द्या, मग सांगतो. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा