मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत शिंदे सरकारचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींची घोषणा करण्यात आली. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहे.
“कापूस आणि सोयाबीन पिकाचा राज्याच्या उत्पन्नात वाटा आहे. गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे नुकसान सोसावे लागले होते. आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मागेच कॅबिनेटने निर्णय घेतला होता. पण आचारसंहिता लागली होती. आता कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजार देणार आहोत. कांदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०० कोटी रुपयांचा फिरता निधी तयार केला जाणार आहे”, अशी मोठी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप
यासोबतच, “शेतकऱ्यांना मोफत वीज व्हावी यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येईल. या योजने करता ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहे”, अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी केली. “नवीन दुग्धव्यवसाय योजना सुरु केली जाईल. नवा उद्योजक निर्माण करताना शेतकऱ्यांमध्ये प्रोत्साहन देण्याचे काम करणार. प्रती लिटर ५ रुपये अनुदान दिले होते. राहिलेले अनुदान त्वरित वितरित केले जाईल. एक लीटर ५ रुपये प्रमाणे १ जुलैपासून अनुदान योजना सुरु केले जाईल”, अशी घोषणादेखील अजित पवार यांनी यावेळी केली.
बांबूची लागवड करण्यात येणार
“बांबूची लागवड केली जाणार आहे. प्रती रोपाकरता १७५ रुपये अनुदान दिले जाईल. वन्यप्राणी हल्ल्यात २० वरुन २५ लाख रुपये मिळणार. पशुधन हानी नुकसान भरपाईत वाढ केली जाईल. अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले जाणार. महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प हाती घेतला जाणार. सांगली येथे सौर उर्जा प्रकल्प राबवला जाणार. गोसेखुर्द प्रकल्पातून ६५ टीएमसी पाणी वळवले जाणार. जल युक्त शिवार अभियान २ राबवले जाईल”, असे अजित पवार यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा