मुंबई | Mumbai
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सोमवार (दि २३) पासून सुरुवात होत आहे. अधिवेशनापूर्वी झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. तर विरोधकांनी नुसते हवेत गोळीबार करणे आणि पळून जाणे योग्य नाही. विरोधकांनी अधिवेशनात प्रश्न मांडावेत, त्याला सविस्तर उत्तर आम्ही देऊ. त्यांना चर्चेची भरपूर संधी देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत आवाहन केले.
महाविकास आघाडीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकल्यानंतर महाविकास आघाडीकडून ठाकरे भास्कर जाधव, आमदार आदित्य ठाकरे,काँग्रेसकडून सतेज पाटील, विजय वडेट्टीवार आदी नेत्यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली. बहुमताचे सरकार असताना विरोधी पक्ष नेत्याची विरोधकांची एवढी भीती का असावी? अशी विचारणा महाविकास आघाडीने केली.
भास्कर जाधव (Bhaskar jadhav) म्हणाले की, प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे सरकार मस्तीत आहे, त्यांना त्याचा माज आहे. सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही आणि संविधानाला अनुसरून हवी तशी वागणूक मिळत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा घात आहे की अपघात आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. पीकविमा बंद करण्यात आला आहे. राज्यात उडता पंजाब सारखी परिस्थिती झाली आहे. एका मंत्र्याच्या गावात ड्रग्ज सापडले. डान्सबारवर रेड होते, त्यात अनेक महिला सापडतात. लाडकी बहिण योजनेमुळे कर्जबाजारी झालो हे सांगुन अनेक महिलांचा लाभ बंद केला. सभापती किंवा अध्यक्ष कधीही पक्षाच्या कार्यक्रमाला जात नाही. मात्र अध्यक्ष पक्षाचा दुपट्टा घालून प्रचार करतात, असे आरोपही भास्कर जाधव बांनी केले.
तर सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले की, गरज नसलेल्या महामार्गाची ८६ हजार कोटींची व्हॅल्यू आज १ लाख २ हजार कोटींवर गेली आहे. १२ जिल्ह्यांमध्ये शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत आहे. मंत्रालयात एसीबी धाड घालते, हे वरचं अप्रूव्हल असल्याशिवाय शक्य नाही. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करण्यासाठी ही धाड होती का? असा सवाल त्यांनी केला.
नुसते हवेत गोळीबार नको : मुख्यमंत्री
विरोधकांनी नुसते हवेत गोळीबार करणे आणि पळून जाणे योग्य नाही. विरोधकांनी अधिवेशनात त्यांच्या मनात शंका असलेले सगळे प्रश्न मांडावेत, त्याला सविस्तर उत्तर आम्ही देऊ. विरोधी पक्षांना भरपूर चर्चेची संधी देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीमध्ये २० हजार कोटींची वाढ झाली आहे. तर महाराष्ट्राला ९८,३०० कोटी रुपयांचा कर परतावा मिळणार आहे. दावोसमध्ये ३० लाख कोटींचे करार करण्यात आले. त्याची काय वस्तुस्थिती आहे याचे सविस्तर विवेंचन या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. महाविस्तार या नावाचे एक एआय अॅप तयार करण्यात आले असून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. पिकाचा फोटो काढला तरी ते अॅप शेतकऱ्याला त्याच्या पिकाची अवस्था काय आहे याची माहिती मिळणार आहे. विरोधकांचे सहा पानाचे आणि १८ मुद्यांचे पत्र आम्हाला मिळाले. जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या एवढ्या चुका या पत्रात करण्यात आल्या आहेत. बातम्यामध्ये आलेले पॅरा आहे तसे यामध्ये टाकण्यात आले आहेत, जराही बदल करण्याची तसदी त्यांनी घेतली नाही.
विरोधी पक्षनेता नसणे हे लाजीरवाणे : राऊत
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणे ही बाब राज्य आणि केंद्र सरकारसाठी लाजीरवाणी आहे. विरोधी पक्षाशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केली. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून अनेक राज्यांत विरोधी पक्षनेता दिला गेला नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता होऊ नये म्हणून चक्क कायदे बदलले जात आहेत. लोकशाहीतील महत्त्वाचे पद नाकारायचे, हे कृत्य काळिमा फासणारे आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
‘या’ मुद्द्यांमुळे गाजण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत अपघाताची किंवा घातपाताची शक्यता, सरकारची संदिग्ध भूमिका हा एक प्रमुख मुद्दा आहे. मंत्री नरहरी झिरवाळांच्या खासगी पीएच्या लाच प्रकरणावरूनही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे, ज्यात झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अलिबाग येथील व्हायरल व्हिडिओवरूनही विरोधक सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करतील. याशिवाय, मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण, शेतकरी आत्महत्या, अमेरिकेसोबतचा ट्रेड डील आणि सातारा ड्रग्स प्रकरण हे मुद्देही चर्चेत येणार आहेत. राज्यात विरोधी पक्षनेतेपद नसणे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावरून दोन्ही सभागृहात खदखद सुरू आहे. यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मांडणार आहेत, आणि भ्रष्टाचार, ड्रग्स प्रकरण आणि विरोधी पक्षनेतेपदावरून हे अधिवेशन तापण्याची शक्यता आहे.





