मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी (Baramati and Rahuri Assembly Constituencies) येत्या २३ एप्रिलला मतदान आणि ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) दुपारी १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशातच आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतून माघार घेतली आहे. मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे हाके यांनी माघार घेत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामतीत (Baramati) दाखल झाले होते. मात्र,कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने हाके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली भावनिक परिस्थिती आणि बारामतीच्या विकासाची निरंतरता लक्षात घेऊन ही निवडणूक (Election) बिनविरोध व्हावी किंवा महायुतीला पाठिंबा मिळावा, अशी विनंती हाके यांना केली. त्यानंतर त्यांनी माघारीची घोषणा केली.
हे देखील वाचा : Maharashtra By Election 2026 : बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला; ‘या’ नावावर जवळपास शिक्कामोर्तब!
यावेळी माध्यमांशी बोलतांना हाके म्हणाले की, “बारामतीमध्ये सहानुभूतीची लाट असून, ही वस्तूस्थिती असताना सुद्धा काही प्रश्नांकडे मला लक्ष वेधून घ्यायचे होते. मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. माझी कुठलीही राजकीय चाल नाही. मी एक ओबीसी आंदोलक असून, भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी नेहमीच आवाज उठवतो. तशी मला स्पेस मिळाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काही आक्रस्ताळेपणे, विद्रोही भावना काही गोष्टी आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करत होतो. राज्यातील सुनेत्राताई पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विनंती केली. याशिवाय उदय सामंत, धनंजय मुंडे या सर्वांनी मला फोन केला, त्यानंतर मी माघारीचा निर्णय घेतला”, असं त्यांनी म्हटले.
दुसरीकडे काँग्रेसने (Congress) बारामतीची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, आकाश मोरे (Aakash More) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज (सोमवारी) दुपारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना रिंगणात उतरवून आव्हान कायम ठेवले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ही निवडणूक ‘अजितदादाच लढवत आहेत’ असे मानून सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले आहे.





