नाशिक | Nashik
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा (Mahayuti Government) आज रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री शपथ घेणार आहेत. आज सकाळपासूनच महायुतीमधील घटक पक्षांतील आमदारांना फोन करून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. यात नाशिक जिल्ह्यातून दादा भुसे आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन आला होता. मात्र, छगन भुजबळ यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नव्हता, त्यामुळे त्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सुरु होत्या. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातून दादा भुसे, नरहरी झिरवाळ यांच्यानंतर आता सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला आहे. आज सकाळी सात वाजता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आमदार कोकाटे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी कुटुंबासह उपस्थित राहण्याचा निरोप धाडला. त्यानंतर सकाळी ११ वाजता आमदार माणिकराव कोकाटे यांची प्रोफाइल विधिमंडळ सचिवालयकडे सादर करण्यात आली. यानंतर आता त्यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले असून ते दुपारी ४ वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे २१ शिवसेनेचे १२ तर राष्ट्रवादीचे १० मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली असून आज भाजपचे १९, शिवसेनेचे ११ तर राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नागपूरच्या राजभवनात दुपारी तीन नंतर हा शपथविधी सोहळा होणार असून राजभवनाच्या प्रशस्त लॉनवर याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. याआधी १९९१ मध्ये शिवसेनेतील फुटीनंतर नागपूरमध्ये शपथविधी झाला होता. त्यानंतर ३३ वर्षांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी हा नागपूरात होत आहे.
राष्ट्रवादीकडून या आमदारांना मंत्रिपदाची संधी
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तमामा भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ
मकरंद पाटील
इंद्रनील नाईक
धनंजय मुंडे
माणिकराव कोकाटे