Wednesday, October 14, 2026
HomeनाशिकNashik Drought News : नाशिक जिल्ह्यातील 'या' तीन तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश;...

Nashik Drought News : नाशिक जिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश; राज्यातील आणखी ४० तालुके दुष्काळग्रस्त घोषित

महाराष्ट्रातील एकूण ३०५ तालुके दुष्काळग्रस्त

नाशिक | Nashik

पाऊस वेळे आधीच माघारी परतल्याने राज्यात दुष्काळाची (Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु इतर तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आल्याने मंत्र्यांसह स्थानिक आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील एकूण ३०५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत.

- Advertisement -

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) जाहीर केलेल्या दुष्काळाच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) चांदवड, निफाड आणि त्र्यंबकेश्वर या तीन तालुक्यांचा समावेश झाला आहे. याआधी मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा या दहा तालुक्यांचा समावेश झाला आहे. तर दिंडोरी आणि नाशिक तालुक्याचा या दुष्काळाच्या यादीत समावेश झालेला नसून, त्यांचा देखील या यादीत समावेश करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील एकूण १५ पैकी १३ तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.

हे देखील वाचा : Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत PM मोदींच्या अभिनंदनाचा ठराव, राज्यातील आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर; CM फडणवीसांची घोषणा

नाशिक विभागातील (Nashik Division) जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि नाशिक मिळून एकूण ५२ तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाला आहे. ५ ऑक्टोबर २०२६ नंतर राज्यातील पावसाळा अधिकृतपणे समाप्त झाला आहे. पर्जन्याची तूट आणि इतर घटकांच्या आधारे ‘Trigger-१’ (प्रथम कळ) आणि ‘Trigger-२’ (दुसरी कळ) या निकषांनुसार राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (बुधवारी) सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) बोलावली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील खरीप हंगाम २०२६ मधील परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळाच्या यादीत आणखी ४० तालुक्यांचा समावेश करत राज्य शासनाने राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. यासंदर्भात मदत व पुनर्वसन विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय (GR) जारी केला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार जमा होणार

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की,”यापूर्वी गेल्या २५ वर्षात राज्यात नोव्हेंबरमध्ये दुष्काळ जाहीर केला जात होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यात येत होती. आपण यावेळी लवकर दुष्काळ जाहीर केला असून, यंदा दुष्काळाचा जीआर ऑक्टोबरमध्येच काढला आहे. आज सप्लीमेंटरी जीआर काढला असून, १२ योजना लागू केल्या आहेत. यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी अडचणीची असून, दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात अग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपये जमा करण्यात येईल”, असे त्यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी जाहीर झालेल्या सवलती व उपाययोजना

१. जमीन महसूलात सूट.
२. पीक कर्जाचे पुनर्गठन.
३. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती.
४. ७.५ हॉर्सपावरपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट.
५. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.
६. रोहयो (MGNREGA) अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे.
७. आवश्यक तिथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सचा वापर करणे.
८. टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे.
९. शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू न देणे.
१०. जनावरांसाठी आवश्यक चारा व पाण्याचे नियोजन करणे.
११. जलसंधारणाची कामे गतीने सुरू करणे.

ताज्या बातम्या

अंगणवाडी

अंगणवाडी सेविका, मदतनीसांची दिवाळी गोड होणार; सरकारकडून २ हजार रुपयांची घोषणा

0
मुंबई | Mumbaiराज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळी बोनस जाहीर केला आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्यांना...