Thursday, October 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत PM मोदींच्या अभिनंदनाचा ठराव, राज्यातील आणखी...

Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत PM मोदींच्या अभिनंदनाचा ठराव, राज्यातील आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर; CM फडणवीसांची घोषणा

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पाच हजार रूपये

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. तसेच राज्यातील आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, राज्यातील एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ (Drought) घोषित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून दिवाळीपूर्वी पाच हजार रूपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार जमा होणार

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की,”यापूर्वी गेल्या २५ वर्षात राज्यात नोव्हेंबरमध्ये दुष्काळ जाहीर केला जात होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यात येत होती. आपण यावेळी लवकर दुष्काळ जाहीर केला असून, यंदा दुष्काळाचा जीआर ऑक्टोबरमध्येच काढला आहे. आज सप्लीमेंटरी जीआर काढला असून, १२ योजना लागू केल्या आहेत. यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी अडचणीची असून, दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात अग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपये जमा करण्यात येईल”, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

राज्यात आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर करण्यात आला असून, आता महाराष्ट्रातील एकूण ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. या दुष्काळग्रस्त तालुक्यांना १२ सवलती मिळणार असून, कर्जमाफीचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. मराठवाड्यात पाणीपातळी तीन मीटरपेक्षा खाली गेल्याने त्याठिकाणी पाहिजे तेवढे टँकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पाण्याच्या टँकरचे जीपीएसद्वारे ट्रॅकिंग होणार असून, राज्यातील पिण्याच्या पाण्याची १६ हजार बेकायदा कनेक्शन तोडण्यात आली आहेत. याशिवाय पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले आहे असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले.

कर्जवसुलीसाठीही बँकांनी अतिउत्साह दाखवू नये

पुढे ते म्हणाले, शैक्षणिक फी (Education Fees) माफीच्या अटी-शर्ती जीआरमधून हटवल्या असून, वीज बिलांसाठी कोणताही तकादा लावण्यात येणार नाही. तसेच कर्जवसुलीसाठीही बँकांनी अतिउत्साह दाखवू नये,जर दाखवल्यास कारवाई केली जाईल. याबाबत खासगी बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच शेतकऱ्यांनी चारा लागवड पीकं घ्यावीत, चार विकत घेऊ नये तो राज्य सरकार देईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

PM मोदींच्या अभिनंदनाचा ठराव

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर राहून सलग पंचवीस वर्षे यशस्वीरित्या जनसेवा केल्याब‌द्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठराव मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्रीगण यांच्याकडून टाळ्यांच्या गजरात ठरावाचे स्वागत करण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठक निर्णय (संक्षिप्त)

• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन. घटनात्मक पदावर राहून सलग पंचवीस वर्षे यशस्वीरित्या जनसेवा केल्याब‌द्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला ठराव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्रीगण यांच्याकडून टाळ्यांच्या गजरात ठरावाचे स्वागत.

• शासकीय मालकीच्या छोट्या, स्वतंत्ररीत्या बांधकामास अयोग्य, चिंचोळ्या आकाराच्या, उपयुक्त आकार नसलेल्या, पोहोच मार्ग नसलेल्या भूखंडांच्या वितरणाच्या धोरणात सुधारणा करण्यास मंजुरी. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ च्या नियम ३७ व ३७ अ मधील तरतुदीत सुधारणा होणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

• श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगांव यांना मौजे गिरडा ( ता. व जि. बुलढाणा) येथील यात्रास्थळ विकासासाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मंजुरी. संस्थानाला यापुर्वीच वृक्षलागवडीसाठी दिलेल्या १९ हेक्टर ६ आर. जमिनीपैकी ३ हेक्टर ८१ आर जमिनीवर बांधकाम करता येणार. यामुळे भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देता येणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क )

ताज्या बातम्या

सुप्रीम

धर्मांतरानंतर जुन्या जातीच्या आधारावर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiधर्मांतरानंतर अनुसूचित जाती आणि जमातींच्या (SC/ST) आरक्षणाचा लाभ मिळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हिंदू सामाजिक व्यवस्थेत...