मुंबई | Mumbai
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आजवर तब्बल २,००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांमागे कर्जबाजारीपणा हा मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सत्ता स्थापन झाल्यानंतर ही आश्वासने हवेत विरल्याचे चित्र आहे. यावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “महायुतीने निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात – ‘योग्य वेळी कर्जमाफी करू’. मग ती ‘योग्य वेळ’ नक्की केव्हा येणार?’’ असा थेट सवाल त्यांनी केला.
दरम्यान, पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील दृष्टिकोन असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, “कर्जमाफीसाठी काही प्रक्रिया असतात. काही नियम आहेत. योग्य वेळ आली, की कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल.” मात्र, ही योग्य वेळ केव्हा येणार याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही.
संजय राऊत यांनी अजित पवारांनाही लक्ष्य केले. “शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता येत नाही, लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे देता येत नाहीत, पण माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्षपद मिळावे म्हणून ५०० कोटी रुपये एका दिवसात आणण्याचे आश्वासन दिले जाते,” अशी टीका करत त्यांनी पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ते राष्ट्रीय नेते आहेत, पण अजूनही गावातच फिरत आहेत,” असेही राऊत म्हणाले.
मनसे आणि शिवसेना (उबाठा) युतीबाबत विचारले असता, राऊत म्हणाले, “राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे नेतेच युतीबाबत निर्णय घेतील. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. जे आजच राजकारणात आले आहेत, त्यांच्या मताला मी काहीच महत्त्व देत नाही.”त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “आज महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संयम आणि त्यागाची गरज आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही अनेक विचारांचे लोक एकत्र आले होते. त्याच इतिहासाची आठवण आजच्या राजकीय नेत्यांनी ठेवली पाहिजे.”
संजय राऊत यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही भाष्य केले. “इराण-इस्त्रायल युद्ध असो किंवा भारत-पाकिस्तान संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार मध्यस्थी करून युद्ध थांबवल्याचा दावा केला. त्यांना त्यावेळी शांतता हवी होती, पण आता त्यांना नोबेल पुरस्कार हवा आहे,” असे त्यांनी उपरोधिकपणे नमूद केले.




