अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यात यंदाच्या अंबिया बहार फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा सरंक्षणाचे कवच लागू राहणार आहे. विमा काढल्यानंतर होणाऱ्या पडताळणीत कमी वयाची फळबागांची विमा संरक्षणासाठी नोंद झाल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येणार आहे. दरम्यान, यंदाच्या अंबिया बहार विमा योजनेसाठी द्राक्ष फळपिकांचा विमा काढण्याची मुदत संपली असून उर्वरितमध्ये मोसंबी, संत्रा, आंबा, डाळींब फळबागांसाठी ३१ ऑक्टोबर ते १४ दरम्यान मुदत आहे.
जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार २०२५-२६ करिता केळी, मोसंबी, पपई, संत्रा, आंबा व डाळिंब या पिकांसाठी सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय फळ पीक विमा पोर्टलवर विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
ही योजना पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे मार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी केळी, मोसंबी, पपईसाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा, काजू पिकासाठी ३० नोव्हेंबर, आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर व डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२६ याप्रमाणे अंतिम मुदत राहील. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होणार आहेत किंवा नाही याबाबत घोषणापत्र भरुन देणे आवश्यक राहील.
योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी अधिसूचित फळबागांचे प्रती शेतकरी कमीत कमी २० गुंठे व जास्तीत जास्त ४ हेक्टर इतके उत्पादनक्षम क्षेत्र असणे आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी ग्रीस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, फळबागेचा जिओ टॅगिंग फोटो, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार, ई-पीक पाहणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अंबिया बहार योजनेत सहभागी होण्यासाठी आंबा पिकासाठी ५ वर्षे, काजू ५ वर्षे, संत्रा ३ वर्षे, मोसंबी ३ आणि डाळींब फळबागेचे उत्पादनक्षम वय २ वर्षे असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी या फळबागांचा विमा उतरवल्यानंतर त्याची कृषी विभागाकडून पडताळणी करण्यात येणार आहे. या पडताळणीत संबंधीत बागेचे उत्पादनक्षम कमी असल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधीत शेतकऱ्यांचे विमा कवच संपुष्टात येणार आहे.




