मुंबई | Mumbai
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित आज सकाळी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विविध खात्याचे मंत्री हजर होते.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्य सरकारने नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले आहे. यासाठी ‘माझे घर-माझे अधिकार’ हे ब्रीद ठेवले असून, तब्बल ७० हजार कोटींची गुंतवणूक गृहनिर्माण खात्याच्या (Home) माध्यमातून केली जाणार आहे. यासोबतच झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम देखील आखला जाणार आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत विधी व न्याय विभागात एक, नगरविकास विभागात एक, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागात एक, गृहनिर्माण विभागात एक आणि जलसंपदा विभागात चार असे एकूण आठ महत्त्वाचे निर्णय (Decision) घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे (संक्षिप्त)
१) राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर – ‘माझे घर-माझे अधिकार’ हे ब्रीद. ₹70 हजार कोटींची गुंतवणूक येणार, झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम. अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा धोरणात प्राधान्याने विचार (गृहनिर्माण विभाग)
२) बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मे. महानगर गॅस लिमिटेड यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देणार (नगरविकास विभाग)
३) उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी (उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)
४) कारंजा, जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय. यासाठी एकूण 28 पदनिर्मितीला तसेच ₹1.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी (विधि व न्याय विभाग)
५) सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या प्रकल्पाच्या ₹5329.46 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता. 52,720 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
६) अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे हेत, तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी ₹2025.64 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता. 5310 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
७) पोशिर प्रकल्प, तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला ₹6394.13 कोटींच्या रुपयांची प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)
८) शिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला ₹4869.72 कोटींच्या प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)