Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखहीच आमुची प्रार्थना..

हीच आमुची प्रार्थना..

महाराष्ट्राला समाजसुधारकांची आणि संतांची संपन्न परंपरा आहे. त्यांच्या चळवळीमुळे महाराष्ट्राची देशात पुढारलेले राज्य अशी ओळख आहे. ‘बस यही अपराध मैं हर बार करता हूँ..आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ..’ असे गोपालदास सक्सेना म्हणतात तर हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे..माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ असे समीर सामंत म्हणतात.

तात्पर्य, मानवता, माणुसकी, सहवेदना, साहचर्य हा माणसाचा स्वभावधर्म आहे. चला आता मी माणुसकी दाखवतो असे म्हणून माणुसकी दाखवली जाऊ शकेल का? सांगून मदतीचा हात पुढे केला जाऊ शकेल का? त्याचा आपसूकच आविष्कार होतो. समोरच्याला त्याची अनुभूती येते. तथापि तेच आता दुर्मिळ होत चालले असावे का? माणसे त्यांच्या स्वभावधर्माला पारखी होत चालली असावीत का? कदाचित त्यामुळेच कोणी माणुसकी दाखवली, सामाजिक संवेदना जपली तर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असावा का? पण ते योग्य नव्हे याची आठवण लेशपाल जवळगे याने करून दिली. सदाशिव पेठेत एका मुलीवर एक तरुण कोयत्याने हल्ला करत होता. लेशपालने त्या तरुणाला धरून त्याच्या हातातून कोयता काढून घेतला. त्यामुळे त्या मुलीचा जीव वाचला. या प्रसंगी त्याला त्याच्या मित्राने मदत केली. त्यानंतर त्या दोघांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्याची राजकीय नेत्यांमध्ये जणू अहमहमिकाच लागली. त्यावर लेशपालने समाजमाध्यमवर एक पोस्ट टाकली. जीव वाचवून आपण त्या ताईवर आपण उपकार केले नाहीत. मी माझे कर्तव्य पार पाडले, अशी भावना त्याने व्यक्त केली. राजकारण करण्यासाठी असंख्य मुद्दे आणि विषय आहेत. पण कोणत्याही मुद्याचा, घटनेचा आणि प्रसंगाचा राजकीय स्वार्थासाठी फायदा करून घ्यायची राजकारण्यांना खोडच जडली असावी का? त्याला दुर्दैवाने सदाशिव पेठेतील घटना अपवाद नाही. महिलांवरील अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत. सामाजिक वातावरण असुरक्षित आहे. दिवसाढवळ्या एक तरुण हातात कोयता घेऊन एका तरुणीचा जीव घ्यायची हिंमत करतो. त्याला पोलिसांचा आणि कायद्याचा धाक का वाटत नसावा? की तो निर्माण झालेलाच नाही? तसे असेल तर ते अपयश कोणाचे? सामान्य लोकांचे निश्चित नाही. समाजात भयमुक्त वातावरण निर्मिती, कायद्याचा आणि पोलिसांचा धाक निर्माण करणे ही नेत्यांची आणि त्यांच्या पक्षांची जबाबदारी आहे. ती पार पाडण्याऐवजी राजकीय स्वार्थासाठी घटनांचा वापर करणे सोपे वाटत असावे का? निदान मानवतेचे, माणुसकीचे आणि सामाजिक संवेदनांचे प्रसंग तरी अपवाद ठेवावेत असेच लेशापालला कदाचित सुचवायचे असावे. त्याने कळत-नकळत राजकीय नेत्यांच्या आणि सामान्यांच्या सुद्धा डोळ्यात झणझणीत अंजन घातले असे म्हणणे चुक ठरेल का? लोकांनी मदतीसाठी धाव घ्यावी अशा अनेक घटना समाजात घडतात. अनेक सामाजिक कामे मदतीच्या हातांअभावी थांबतात. संस्था बंद पडतात. लाखो लोक अर्धपोटी किंवा उपाशी झोपतात. तथापि लोक बघ्याची भूमिका घेताना आढळतात. लोक त्यांच्या स्वभावधर्माला जागले तर सामाजिक सुधारणांचा वारसा पुढे चालत राहील हेच जवळगे याने सुचवायचा प्रयत्न केला आहे. तो कळेल का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या