नवी दिल्ली |वृत्तसंस्था| New Delhi
केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीत चर्चा आज (दि.3) रोजी झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. 13 कोटी मराठी जनांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त होत आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी आपली मराठी भाषा ही आता देशातील 7 वी भाषा ठरली आहे. सन 2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली. तामिळनंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. आता, विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यांकांना प्रोत्साहन देणारा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारने मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची बातमी दिली आहे. आमच्याकडे आतापर्यंत ज्या नोटिफाईड अभिजात भाषा होत्या. त्यात कन्नड, तेलुगु, मल्याळम होत्या. नव्या भाषेसाठी प्रस्ताव आला. फ्रेम वर्कमध्ये त्या बसल्या आणि त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आता ज्या नव्या भाषा येतील त्यांनाही याच फ्रेमवर्कमध्ये बसवलं जाणार आहे, अशी प्रतिक्रिया अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.