मुंबई । Mumbai
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ‘वयानुसार आता कधीतरी थांबावं असं वाटतंय,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः शिवसेना पक्षात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री शिरसाट यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी एक अल्पसंतुष्ट माणूस आहे. मला नेहमीच हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे, अशी कोणतीही हाव नव्हती. मी सलग दहा वर्षे नगरसेवक म्हणून आणि वीस वर्षे आमदार म्हणून काम केले आहे. जे स्वप्न कधी पाहिले नव्हते, ते सारे काही मला मिळाले आहे. त्यामुळे मला आणखी काही पाहिजे, अशी कोणतीही अपेक्षा नाही, जे आहे त्यात मी समाधानी आहे.”
राजकारणातून निवृत्तीचा विचार करण्यामागे कोणताही राजकीय दबाव, कोणाची टीका किंवा वैताग हे कारण नसल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. “शेवटी, माणसाचे वय त्याला काही कारणांनी थांबायला भाग पाडते. रोजची धावपळ आणि दगदग करण्यापेक्षा आता कधीतरी थांबावे का, असा प्रश्न माझ्या मनात आहे,” असे ते म्हणाले.
शिरसाट यांनी पुढे सांगितले, “सध्या माझे वय ६४ वर्षे असून, लवकरच मी ६५ व्या वर्षात प्रवेश करणार आहे. मला राजकारणासाठी २०२९ पर्यंत वेळ आहे. त्यावेळी मी ६९ वर्षांचा असेन. त्यामुळे पुढे काय करायचे, याचा विचार आतापासूनच करणे आवश्यक आहे.” राजकारण हे जनसेवेची संधी असले तरी, सध्या त्यांच्याकडे असलेले खाते मोठे आहे आणि ते समाधानी व चांगले काम करत आहेत.
याच दरम्यान, नवी मुंबईतील सिडकोच्या ५ हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर होत असलेल्या टीकेलाही संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिरसाट यांच्यावर ‘मलिदा गँगचे मास्टरमाईंड’ असल्याची टीका करत राजीनाम्याची मागणी केली होती. या आरोपांना उत्तर देताना शिरसाट म्हणाले, “सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे सर्व पुरावे द्यावेत. आरोप करणारे हे मूर्ख लोक आहेत. बेछूट आरोप करून व्यक्तीला ब्लॅकमेल करण्याचा आणि जमीन बळकावण्याचा हा प्रयत्न आहे.”
शिरसाट यांनी टीकाकारांना आव्हान दिले की, “तुम्ही ज्यांच्यासोबत फिरता, त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, हे पाहा. ज्यांच्या दलालीसाठी हे आरोप केले जात आहेत, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे.” सिडकोने या प्रकरणावर आधीच स्पष्टीकरण दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांनी बिवलकर यांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचा सल्लाही दिला. मंत्री शिरसाट यांच्या निवृत्तीच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.




