मुंबई | Mumbai
निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून १० मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर ही निवडणूक (Election) पार पडत आहे. त्यामुळे आता या जागांवर कुणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशातच आता भाजपने (BJP) विधानपरिषदेच्या ३ जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांनी तीन नेत्यांची नावे दिल्लीच्या (Delhi) पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत. यात आर्वी विधानसभेचे माजी आमदार दादाराव केचे (Dadarao Keche) काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आणि खासदार अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी आमदार अमरनाथ राजूरकर (Amarnath Rajurkar) आणि भाजप प्रवक्ते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांची नावे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर या तीन नेत्यांची उमेदवारी निश्चित होणार आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये (Mahayuti) विधानपरिषदेच्या पाच जागांपैकी भाजपच्या वाटेला तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) वाटेला प्रत्येकी एक जागा आली आहे. या जागांवर उमेदवारी (Candidacy) मिळावी यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता भाजपची तीन नावे निश्चित झाल्याचे समजते.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक १० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच १७ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर १८ मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २० मार्च आहे.तर २७ मार्चला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर मतदान पूर्ण झाल्यावर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.