मुंबई | Mumbai
सध्या महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यासोबत मुंबईतही काल रात्रीपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी रिपरिप तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचे रुप पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले असून काही ठिकाणी तर ढगफुटी सदृष्य पाऊस देखील झाला आहे.
राज्यात गेल्या २ ते ३ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने पिकांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र, २ ते ३ दिवसांपुर्वी पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने पीकांना जीवदान मिळाले आहे. तर, काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचले. यामुळे पीके धोक्यात आली आहे.
२५ आणि २६ जुलैला महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसह सात जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले. कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत अन् घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भात पावसाचा हाय अलर्ट
विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना हवामानविभागाने आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. यामुळे शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून एसडीआरएफ टीम्सला अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. तर नागपूर, वर्धा, आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २४ तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. गोंदिया जिल्ह्याला काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपले आहे. अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत.
मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस
महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, रायगड आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, जुईनगर, बेलापूर आणि वाशी परिसरात पाऊस कोसळत आहे. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची पावसामुळे तारांबळ उडाली असली तरी, सध्या मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि लोकल ट्रेन सेवा सुरळीत सुरू आहेत.
मराठवाड्यात मुसळधार
गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे शेतीला जीवदान मिळाले आहे. नांदेड शहरालगत असलेले विष्णुपुरी धरण सध्या ८४ टक्के भरले आहे. दोन दिवसांपूर्वी २४ टक्के पाणीसाठा असलेल्या या धरणात झपाट्याने वाढ झाली असून, आता शहराचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




