मुंबई | Mumbai
नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik Trimbakeshwar) येथे पुढील वर्षी होणार्या सिंहस्थासाठी साधू-महंतांच्या साधुग्रामसाठी तपोवनातील तब्बल १८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. मात्र ही झाडे तोडण्याला पर्यावरणवादी, अनेक सामाजिक संघटना, कलाकार यांच्यासह मनसे, शिवसेना (उबाठा) शिंदेंची शिवसेना, काँग्रेस यासह आदी पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी तपोवनाला भेट देऊन झाडांची कत्तल करण्यास विरोध केला होता.
त्यावेळी शिंदे यांनी “नाशिकच्या तपोवनमधील झाडे तोडणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मला अनेक फोन येत आहेत. एक झाड तोडून दहा झाडे लावू असे विधान गिरीश महाजन यांनी केलं. मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने असे बोलणे योग्य नाही किंवा त्यांचे विधान बेजबाबदार आहे. असं बोलून ते काय चेष्टा करत आहेत का. तपोवनामध्ये जुनी झाडे आहेत. ते म्हणत आहेत की एक झाड तोडून दहा झाडे लावू. आम्ही म्हणतोय की एक झाड वाचवण्यासाठी १०० माणसं मरायला तयार आहोत, पण ते झाड तोडू देणार नाही” असं म्हणत त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आज (सोमवारी) सयाजी शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी सयाजी शिंदे यांच्यासोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) हे देखील उपस्थित होते. मागील आठवड्यातच मनसेने अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करत आंदोलन केले होते. त्यानंतर आज सयाजी शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेत तपोवनातील वृक्षतोडीबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर सयाजी शिंदे काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सयाजी शिंदे म्हणाले की, तपोवनातील आंदोलनासाठी ज्यांनी ज्यांनी पाठिबा दिल्या त्यापैकी राज ठाकरे एक आहेत. राज ठाकरेंची मी आज भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. झाडं कशी वाचली पाहिजेत याबाबत चर्चा केली. वेगळी झाडं वगैरे लावता येत नाही. १५ फुटांची झाडं वगैरे काही अर्थ नाही. ज्या ठिकाणी झाडं आलीच नाहीत तिथे १५ फुटांची झाडं कशी लागणार? मुद्दा असलेल्या झाडांचा आहे ती झाडं का तोडायची आहेत? ती झाडं तोडायची नाहीत हाच मुद्दा आहे. कुंभमेळा झाला पाहिजे त्याबाबत आदर आहेच. पण नवीन झाडांची फसवणूक नको, आहे ती झाडं तोडली जाऊ नयेत. वनराई आहे, देवराई आहे ती तुटायला नको ही आमची भूमिका आहे. मला झाडांशिवाय बाक़ी कुणी काय बोलतं ते काही कळत नाही. तपोवनाच्या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला त्याच संदर्भात माझी त्यांची चर्चा झाली. गिरीश महाजन हे ठाकरे बंधूशी बोलणार आहेत तर त्यांचा संवाद होऊ द्या मी त्याबाबत काय बोलणार? उद्धव ठाकरेंचीही मी भेट घेणार आहे. ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांची आम्ही भेट घेणार आहोत. सरकार काही दुश्मन नाही. पण आमची भूमिका काय हे सरकारला समजले पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे. अजित पवारांनी मला पाठिबा दिला याचा मला आनंद आहे. तसंच सगळ्याच कलाकारांचीही भूमिका आहे की झाडे वाचली पाहिजे. कुणालाच वाटतं नाही की झाड तोडली पाहिजेत.यावर वेळ पडली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे सयाजी शिंदे म्हणाले.




