बुलढाणा | Buldhana
राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक विधान केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यासाठी औरंगजेब बदनाम झाला, पण त्यांना त्यांच्याच सासऱ्यांनीच मारले, असे वक्तव्य त्यांनी केले. बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. त्यावेळी बोलतांना कडू यांनी विधान केले असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वतनदारी बंद केली, त्या वतनदारीविरोधात पहिले आंदोलन झाले.पाटील, कुलकर्णी, देशपांडे, देशमुख… सर्व जातीत ज्या गावात जी जात मोठी असेल, त्याचा वतनदार असायचा. तो २० गावांना लुटायचा. तेव्हा जर ४ क्विंटल कापूस आला, तर त्यातील दोन क्विंटल त्याला द्यावा लागत होता. नाही दिलं तर ते पोरी-बाळी उचलून घेऊन जायचे, हे आमचेच वतनदार होते. त्या वतनदारीतून गुलामशाही, आदिलशाही, निजामशाही चालायची. मात्र, पहिली वतनदारी बंद केली म्हणून संभाजीराजे सासऱ्यांकडून मारले गेले. या कारणानेच औरंगजेबाचे नाव बदनाम झाले असले तरी सासरा किती कारणीभूत आहे, हे शोधायला हवे, असा दावा त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले, “अनेक नेते-जसे की शरद जोशी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘पाडले’ गेले त्याचप्रमाणे मला पण पाडले जाईल. कारण मी कुणाच्या जातीत बसलो नाही. शेतकऱ्यांनी (Farmer) जर आपली भूमिका मजबूत ठेवली नाही तर कोणीही त्यासाठी उभा राहणार नाही”, असेही कडू यांनी म्हटले. तसेच आमदार कडू यांनी पंजाबमधील (Punjab) शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, पंजाबच्या शेतकऱ्यांनी १३ महिने आंदोलन करून काळे कायदे रद्द करायला लावले. आणि आम्ही बायकोची आठवण आली की चाललो घरी. तुम्ही शेतात जेवढी मेहनत करता, त्याच्या फक्त एक टक्का मेहनत आंदोलनात करा, तुमचे काम होईल, असे म्हणत कडू यांनी येत्या २८ तारखेला शेतकऱ्यांनी नागपूर येथे एकत्र येण्याचे आवाहन केले.
आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका
शेतकरी हे जाती धर्मात विभागल्याने शेतकरी एकत्र येत नाही, नाहीतर सरकार एका दिवसात सरळ होईल. गाव आणि शेतकरी गरीब राहिला तरच शहरे श्रीमंत होतील. सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातील या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं. तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येते. शेतकऱ्याला आपण जर विचारलं तर तू काय करतो तर त्याला काहीच येत नाही. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.




