मुंबई | Mumbai
मागील महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Affected) अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सरकारकडे मदतीची मागणी केली जात होती. यानंतर अखेर आज (दि.०७) रोजी राज्य सरकारने (State Government) ३१ हजार ६२८ कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यंदा राज्यातील १ कोटी ४३ लाख २२ हजार २८१ हेक्टर जमिनीवर पिकांची लागवड झाली होती. त्यापैकी ६८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले आहे. यातील ७५ लाख शेतकऱ्यांचे १२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनींवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच १ लाख ६१ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला. तर ९ हजार २६३ हेक्टर जमिनीवरील माती खरडून गेल्याने २६ हजार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, राज्यातील २९ जिल्ह्यांत (District) मोठे नुकसान झाले असून, २५३ तालुक्यांना सरसकट मदत करण्यात येणार आहे. तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १८ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे, तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २७ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. याशिवाय बागायती शेतीला ३२ हजार ५०० रुपयांची मदत केली जाणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
अतिवृष्टी बाधितांसाठी CM फडणवीसांच्या १० मोठ्या घोषणा
१) राज्य सरकारकडून ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज.
२) खरडून गेलेल्या शेतीला ४७ हजार हेक्टरी आणि नरेगाच्या माध्यमातून ३ लाख हेक्टरी अशी एकूण साडेतीन लाख हेक्टरी भरपाई मिळणार.
३) हंगामी बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २७ हजार आणि बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३२ हजार ५०० रुपयांची मदत.
४) अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे नुकसान झाले त्यांच्यासाठी ३० हजार रुपयांची विशेष मदत.
५) दुधाळ जनावरांना ३७ हजार रुपयांपर्यंत तर कुकुटपालनाला प्रति कोंबडी १०० रुपये मदत.
६) पडझड झालेली घरे पीएम आवास योजनेंतर्गत नव्याने बांधून देण्यात येतील. याशिवाय ज्यांच्या घराचे काही प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यांना घर उभारणीसाठी मदत केली जाईल.
७) डोंगरी भागातील घरांना १० हजार तर गोठा, दुकानदार यांना ५० हजारांची मदत सरकारकडून केली जाणार.
८) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करणार.
९) विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी १७ हजार तर कोरडवाहू शेतकऱ्यांना ३५ हजार रुपये मदत.
१०) बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना ५० हजारांहून अधिक मदत मिळेल.





