मुबंई | Mumbai
मुंबईतील वरळीमध्ये (Varli) झालेल्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाकरे बंधू तब्बल २० वर्षांनी एकाच राजकीय व्यासपीठावर आले होते. या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले आणि जाब विचारला. तब्बल दोन दशके एकमेकांशी वितुष्ट असल्यासारखे वागणारे या दोन्ही बंधूंचे कुटुंबिय आज एकत्र एकाच मंचावर दिसून आले.
यावेळी मेळावा संपल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राजकीय (Political) क्षेत्रातील सर्व बड्या नेतेमंडळींना मंचावर बोलावले. त्यांचे आभार मानले आणि त्यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यानंतर राज आणि उद्धव यांचे कुटुंबीय देखील एकाच व्यासपीठावर आले आणि एक उत्तम फॅमिली फोटो (Family Photo) घेतला. यावेळी राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरे सर्वांनी एकत्रित उभे राहून फॅमिली फोटोसाठी पोज दिली.
आदित्य आणि अमित ठाकरेंचाही हातात हात
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा (MNS and Shivsena UBT) मराठी भाषेचा विजयी मेळावा संपल्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली. यावेळी दोघे सोबत व्यासपीठावर आले. त्यानंतर स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवत उपस्थितांना अभिवादन केले. त्यानंतर राज ठाकरेंच्या शेजारी आदित्य आणि उद्धव ठाकरेंच्या शेजारी अमित यांनी उभे राहून फोटो काढला. यानंतर दोन्ही कुटुंबियांनी एकत्र फोटो काढला.
सुप्रिया सुळेंनी वेधलं लक्ष
आजच्या मेळाव्यात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या एका कृतीने उपस्थितांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. मंचावर नेतेमंडळी एकमेकांच्या भेटी घेत होते, हस्तांदोलन करत होते. याचवेळी सुप्रिया सुळे यांनी एक गोष्ट हेरली. व्यासपीठावर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांना एकत्र आणलं. तसेच या दोन्ही नेत्यांच्या हातांना धरून मंचावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बाजूला उभे केले. त्यांच्या या कृतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढची पिढीदेखील सोबत पाहायला मिळाली. नंतर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र उभे राहून जनतेला अभिवादन केले.




