मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
ट्रेडमार्क उल्लंघन प्रकरणात (Trademark Infringement Cases) स्वतःच्या बाजूने एकतर्फी मनाई आदेश मिळवण्यासाठी काही माहिती लपवणे एका पक्षकाराला चांगलेच महागात पडले. भौतिक तथ्ये जाणूनबुजून लपवली आणि न्यायालयाची पद्धतशीरपणे फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने संबंधित पक्षकाराला तब्बल ५० लाख रुपयांचा दंड (Fine) ठोठावला. न्यायमूर्ती आरिफ डाॅक्टर यांनी पक्षकाराला हा दंडाचा दणका दिला.
शोबन सलीम नावाच्या व्यक्तीने चैतन्य अरोरा यांच्याविरोधात दाखल केलेल्या दाव्याची सुनावणी न्यायमूर्ती डाॅक्टर यांच्यापुढे झाली. यावेळी पक्षकाराने थेट न्यायालयाचीच फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्याची गंभीर दखल न्यायमूर्तींनी घेतली आणि पक्षकाराला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. पक्षकाराने केवळ एकतर्फी अंतरिम आदेश मिळविण्यासाठी न्यायालयाची फसवणूक (Fraud) केली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. न्यायालयाची फसवणूक करणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले आणि दावा दाखल करणाऱ्या पक्षकाराला चार आठवड्यांच्या आत दोन प्रतिवादींना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले.
फुटवेअर ब्रँडचा मालक असलेल्या पक्षकाराने उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली. दिल्लीतील व्यापाऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत ट्रेडमार्कशी साम्य असलेल्या चिन्हाचा वापर करण्यापासून कायमस्वरूपी मनाई करावी, अशी मागणी त्याने केली होती. त्याच्या विनंतीची दखल घेत न्यायालयाने प्रतिवादींना संबंधित चिन्हासह फुटवेअरचे उत्पादन आणि विक्री करण्यापासून रोखणारा एकतर्फी अंतरिम मनाई आदेश जारी केला. त्या आदेशाला अनुसरुन न्यायालयाच्या रिसीव्हरने बाजारातून प्रतिवादींच्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त केला होता. मात्र नंतर पक्षकाराने स्वतःच्या बाजूने अंतरिम मनाई आदेश मिळवण्यासाठी काही माहिती लपवून ठेवल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यावर न्यायालयाने संबंधित फूटवेअर ब्रॅंड मालकाला ५० लाख रुपये दंड ठोठावला.




