मुंबई | Mumbai
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या फोडाफोडी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांचे संबंध कमालीचे बिघडले आहेत. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आलंय. हुतात्मा चौकातील कार्यक्रमात शिंदे फडणवीसांनी एकमेकांशी बोलणं टाळलंय.. या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारे संवाद झाला नाही. त्यामुळे राजकीय चर्चेला आणखी जोर धरलाय.
विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारचा शपथविधी नुकताच पार पडला. या शपथविधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित होते. मात्र या शपथविधीदरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवरून हे दोन्ही नेते एकमेकांवर नाराज असल्याचे दिसून येत होते. या शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या विमानांमधूना पाटणा येथे गेले. तसेच शपथविधीवेळीही ते लांब लांब बसल्याचे दिसून आले.
एवढेच नाही तर हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त दोघे जण कार्यक्रमाला उपस्थित होते दोघांनी एकमेकांना नमस्कार केला पण दोघांची ही देहबोली आणि चेहरे काहीतरी वेगळेच सांगत होती. हुतात्मा स्मारकाजवळील कार्यक्रमावेळी समोरासमोर आल्यावर शिंदे आणि फडणवीस यांनी केवळ औपचारिकता म्हणून एकमेकांना अभिवादन केले आणि दोघेही बाजूला झाल्याचे दिसले. एवढेच नाही तर या कार्यक्रमानंतर महायुतीमधील नाराजीबाबत विचारले असता एकनाथ शिंदे यांनी त्या प्रश्नाला बगल देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे त्यांच्यातील संबंधांवरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत, कारण त्यांचे चेहरे बरेच काही सांगून जात होते असे दिसून आले.
देशदूत व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





