मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) पुन्हा महायुतीचे सरकार (Mahayuti Government) स्थापन झाल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे ते पक्षात नाराज होते. अखेर भुजबळ यांची ही नाराजी दूर झाली असून, त्यांचे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात कमबॅक झाले आहे. भुजबळ यांनी आज (मंगळवारी) सकाळी राजभवन येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र, भुजबळ यांचे कट्टर विरोधक आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या या शपथविधीवर माध्यमांशी बोलतांना तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, “छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घ्यावी की नाही? हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. परंतु, अजित पवार (Ajit Pawar) मोठी चूक करत आहेत. या चुकीच्या परिणामाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे, त्याला मंत्रिपद दिले जात आहे. भुजबळ मंत्री होत असल्याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही, असे त्यांनी म्हटले.
तसेच “अजित पवार हे जातीयवादी लोकांना पोसण्याचे काम करत असून, त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका (Election) आल्यामुळे छगन भुजबळ यांना तात्पुरता आनंद दिला असणार आहे. भुजबळ यांना हे चॉकलेट दिले असून, त्यांच्या आनंदावर लवकरच विरजण पडणार आहे. छगन भुजबळ जातीयवादी असून, त्यांना मंत्रिपद देऊ नका, असा विरोध अजित पवार यांच्या पक्षातील सगळ्या आमदारांनी (MLA) करायला पाहिजे होता”, असेही मनोज जरांगे म्हणाले.