नाशिक | Nashik
आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून शासन रुग्णांना आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करत असले तरी कर्करोग उपचारांचा वाढता खर्च सर्वसामान्य नागरिकांसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. देशात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून किमोथेरपी व रेडिएशनसारख्या उपचारांचा खर्च प्रचंड असल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक ओझे येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांच्या हितासाठी टाटा रिसर्च सेंटरची स्वतंत्र व पूर्ण क्षमतेची शाखा सुरू करावी, अशी मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांनी विधिमंडळात केली.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सोमवारपासून सुरु झाले आहे. या अधिवेशनात आमदार फरांदे यांनी प्रश्न उपस्थित करत टाटा रिसर्च सेंटर उभारण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी शासकीय योजनांमधून काही प्रमाणात मदत मिळत असली तरी उपचारांचा संपूर्ण खर्च भागत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचे खर्चाने कंबरडे मोडत आहे. रुग्णांना खाजगी व शासकीय रुग्णालयांतील खर्चातील तफावतीचा मोठा फटका बसत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Minister Prakash Aabitkar) यांनी उत्तर देतांना संदर्भ सेवा रुग्णालयात लवकरच कर्करोग उपचार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र, यावर आमदार फरांदे यांनी समाधान व्यक्त न करता स्पष्ट केले की, त्या ठिकाणी मर्यादित क्षमतेने सेवा देणे अपुरे ठरेल. उत्तर महाराष्ट्रासाठी मोठ्या जागेवर अत्याधुनिक, पूर्ण क्षमतेचे कर्करोग रुग्णालय व टाटा रिसर्च सेंटरची शाखा उभारण्यात यावी, अशी पुनश्च मागणी केली. तसेच नाशिकच्या सर्व आमदारांची तातडीने बैठक घेऊन हा निर्णय मार्गी लावावा, अशी मागणीही फरांदेंनी केली.
दरम्यान, यावर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नाशिकच्या आमदारांची (Nashik MLA) लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर फरांदे यांनी नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र असून आरोग्य क्षेत्रात प्रगती करत आहे. त्यामुळे येथे टाटा रिसर्च सेंटरची शाखा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील हजारो कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.





