मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा (Maharashtra Sadan Construction Scam) प्रकरणात अजित पवार गटाचे (Ajit Pawar) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला. छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांना दोषमुक्त करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) नेत्या अंजली दमानिया यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या न्यायालयाने सुनावणी २८ एप्रिलला निश्चित केली. सरकारी वकील गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने सुनावणी तहकूब ठेवली.
महाराष्ट्र सदन बांधकामातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात ९ सप्टेंबर २०२१ रोजी एसीबीच्या विशेष न्यायालयाने छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांना दोषमुक्त केले. त्या निर्णयाला आव्हान देत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, दीपक देशपांडे यांच्यासह आमदार सुहास कांदे यांनी तीन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर न्यायालयाने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये भुजबळ कुटुंबियांना नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर सुनावणी (Hearing) प्रलंबित होती.
सुमारे एक वर्षानंतर या याचिकांवर (Petitions) बुधवारी न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर सुनावणी निश्चित करण्यात आली होती. काल बुधवारी सुनावणीच्यावेळी घोटाळ्यात (Scam) आरोपी असलेल्या माजी प्रधान सचिवांतर्फे अॅड. गिरीश कुलकर्णी यांनी याचिकेलाच जोरदार आक्षेप घेतला. या प्रकरणात अंजली दमानिया मूळ तक्रारदार नाहीत किंवा साक्षीदारही नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना भुजबळ कुटुंबीयांच्या दोषमुक्ततेला आव्हान देण्याचा हक्क आहे की नाही, हे तपासणे आधी महत्त्वाचे आहे, असा मुद्दा उपस्थित केला.
तर ज्येष्ठ वकील रिजवान मर्चेंट यांनी दमानिया यांच्या याचिकेवर कोणते खंडपीठ सुनावणी घेऊ शकते, याबाबत हायकोर्ट रजिस्ट्रीला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला (Court) केली. यावेळी सरकारी वकील गैरहजर राहिल्याचे न्यायमूर्ती डिगे यांनी नोंद घेत याचिकेची सुनावणी २८ एप्रिलपर्यंत तहकूब ठेवली. त्यामुळे भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.
काय आहे आरोप?
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाममंत्री असताना महाराष्ट्र सदन बांधकामाच्या कंत्राटांमधून भुजबळ कुटुंबियांच्या कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांची लाच मिळवली, असा आरोप दमानिया यांनी केला होता. त्याआधारे आधी एसीबीने व नंतर ईडीने गुन्हे नोंदवले होते. याप्रकरणी छगन भुजबळांना १४ मार्च २०१६ रोजी अटक होऊन दोन वर्षे तुरुंगात राहावे लागले होते.