मुंबई | Mumbai
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या गाडीवर अहिल्यानगर तालुक्यात (Ahilyanagar Taluka) खडकी परिसरातील अरणगाव शिवारात अज्ञात व्यक्तींनी हल्ला (Attack) केल्याची घटना समोर आली होती. यात हल्लेखोरांनी हाकेंच्या वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. या हल्ल्याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोlलिसांनी (Police) तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हल्ल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, “आम्ही जीव जाईपर्यंत लढणार असून, मुख्यमंत्र्यांना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा. तुम्ही अजिबात आमची काळजी करू नका. हा माझा वैयक्तिक विषय नसून, मी कुठलाही गुन्हेगार नाही. कधीच कायदा हातात घेतला नाही. फक्त ओबीसींची (OBC) बाजू मांडत आहे तरी देखील हल्ले होत आहेत. तुम्ही ओबीसींची बाजू ऐकून घ्यायला तयार नाहीत. आमच्यावर हल्ले होत असून, त्यावर तुम्ही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे आता ओबीसींनी महाराष्ट्रात राहायचं की नाही याचं उत्तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी द्यावं, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “आम्ही उपोषण केल्यापासून आजपर्यंत नऊ वेळा हल्ले झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही महाराष्ट्रात (Maharashtra) जगायचं की नाही? आम्ही घराच्या बाहेर पडायचं की नाही, तेवढंच आम्हाला सांगावं. आम्ही आमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी भांडत नसून, महाराष्ट्रातील ६० टक्के ओबीसींच्या प्रश्नावर भांडत आहोत. ओबीसींनी बाहेर यायचं नाही. ओबीसींनी बोलायचं नाही, अशी जर कुणाची भूमिका असेल, तर मुख्यमंत्री महोदय ही लोकशाही आहे. संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. महाराष्ट्र बोलत नाही, याचा अर्थ त्याला काही कळत नाही, या भानगडीत तुम्ही पडू नका”, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी यावेळी सरकारला दिला.




