मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. पहिलीपासून हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, या निर्णयाचा विरोध जनतेसह मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. मात्र, राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर कायम असल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत हिंदी सक्तीविरोधात (Hindi Compulsion) सरकारला (Government) मोठा इशारा दिला आहे.
यावेळी बोलतांना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, “शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज भेट घेतली. त्यांनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला, जी मी संपूर्णपणे फेटाळून लावली. आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितले. पाचवीनंतरच तिसऱ्या भाषेचा विषय येतो. त्यांनी हे मान्य केलं की, राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणत्याही गोष्टीचा समावेश नाही. राज्यांवर टाकलेली गोष्ट आहे. राज्यावर गोष्ट टाकली तर हे का करत आहे, हे अजूनही अनाकलनीय आहे. सीबीएससी शाळा (CBSE School) या नव्याने आल्या. त्या आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी काढलेल्या शाळा होत्या. त्या शाळांचा वर्चस्व राज्यातील शाळांवर करण्याचा प्रयत्न आहे. तोच केंद्र आणि आयएएस अधिकाऱ्यांचा अजेंडा आहे. महाराष्ट्र हे का करतोय? काही राज्य करत नाही. त्यांच्याकडे काही गोष्टींचं उत्तर नव्हतं. तेच तेच म्हणत होते. आमचा या सर्व गोष्टीला विरोध होता, असेल आणि राहणार”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “शाळेत पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती मी कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. या गोष्टींसाठी ६ जुलैला गिरगाव चौपाटीवर मोर्चा (Morcha) काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कुठलाही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल. शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी, पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत. विद्यार्थी आणि पालकांना यायला जमेल म्हणून मी रविवारी निवडला आहे. मी बाकीच्या राजकीय पक्षांशी चर्चा करणार आहे. हा जो कट आहे, महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा जो कट आहे, हा उद्ध्वस्त करण्यासाठी तमाम मराठी बंधू आणि भगिनींनी मोर्चात सहभागी व्हावं, अशी माझी विनंती आहे. याठिकाणी कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल. त्या अजेंड्यासाठी तमाम मराठी बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत. महाराष्ट्राची संपूर्ण ताकद ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल. अशावेळी मला या मोर्चात कोण सामील होतं आणि कोण येणार नाहीत, हेदेखील बघायचं आहे”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.





