मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अमेडिया कंपनीने ४० एकर १८०० कोटी रुपये किंमत असलेली जमीन ३०० कोटींना खरेदी केल्याचा आरोप करत विरोधकांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. तर अजित पवारांनी या जमिनीचा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली असून, ही जमीन सरकारला परत केली जाईल, असे सांगितले आहे.
त्यानंतर आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रतिक्रिया दिली आहे. ते अकोल्यात माध्यमांशी संवाद साधतांना बोलत होते. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार जमीन प्रकरण गंभीर आहे असं सांगितलं आहे. मुख्यमंत्री (CM) एखादा विषय गंभीर आहे असं म्हणत असतील, तर त्यासंबंधी चौकशी करुन वास्तव हे त्यांनी समाजासमोर ठेवलं पाहिजे”, असे शरद पवारांनी म्हटले.
तसेच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पार्थ पवारांवर होणार्या आरोपांवर दिलेल्या प्रतिक्रियेवरूनही राळ उठवली जात आहे. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले,”कुटुंबाची विचारधारा एक असून प्रशासकीय आणि कौटुंबिक गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे मत वैयक्तिक असू शकतं’ असंही शरद पवारांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, “हा जमीन (Land) व्यवहार दुय्यम निबंधकांनी रद्द केला आहे. त्यांच्याकडे मजबूत पुरावे गोष्टी असतील, त्याआधारे निर्णय घेतला असेल. असेही शरद पवारांनी म्हटले. तसेच शीतल तेजवानी आणि अन्य व्यक्तींबाबत बोलतांना ते म्हणाले. “कोण तेजवानी, आणखी कोण, यांची नावं मला माहिती नाही. ज्यांनी याबाबत आरोप केले, त्यांनीच हे सगळं शोधून काढावे”, असेही त्यांनी सांगितले.




